इंदिरा आवास योजनेच्या घरकुल वाटपात बुलडाणा राज्यात तिसरा
By Admin | Published: February 2, 2016 02:16 AM2016-02-02T02:16:33+5:302016-02-02T02:16:33+5:30
अनुसूचीत प्रवर्गातील एकही लाभार्थी शिल्लक नाही; स्वत:ची जागा नसणारेच अतिक्रमक अपात्र.
बुलडाणा : इंदिरा आवास योजनेअंतर्गत अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमातीमधील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेत दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात बुलडाणा जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून अनुसूचीत जातीमधील एकही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचीत राहिलेला नाही हे विशेष. दारिद्रय़ रेषेखालील अनुसूचित जाती/जमाती, अल्पसंख्यक व इतर सर्वांसाठी असलेल्या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी अनुदान उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांना २0१५-१६ या आर्थिक वर्षासाठी १ लाख ५७ हजार २६0 घरकुलं बांधकामाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यात २९ जानेवारी २0१६ पर्यंत राज्यात ६९ हजार ११५ घरकुलं बांधण्यास मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे योजनेतील घरकुल उद्दीष्टपूर्तीमध्ये नंदुरबार, भंडारा जिल्ह्यानंतर बुलडाणा जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला. २0१५-१६ या आर्थिक वर्षासाठी बुलडाणा जिल्ह्यातील ४ हजार ६८३ घरकुल बांधकामाचे उद्दीष्ट शासनाकडून देण्यात आले. यात जिल्ह्यात ३ हजार ५१४ योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी घरकुलं मंजूर करण्यात आली. यात अनुसुचित जातीसाठी १९९८, अनुसुचित जमातीसाठी ५१६, अल्पसंख्याकसाठी ४५0 आणि इतर पात्र लाभार्थ्यांसाठी ५५0 घरकुल बांधकामास मंजूरी देत जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. नंदुरबार जिल्ह्याने १५३७७ पैकी १३८१४ घरकुलांना मंजुरी देत प्रथम क्रमांक तर भंडारा जिल्ह्याने ४३८५ पैकी ३४७0 घरकुलांना मंजूरी देत द्वितीय क्रमांक मिळविला.