थर्टी फर्स्टला पोलिसांचा ताण यंदा झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:45+5:302021-01-02T04:28:45+5:30
नाही म्हणायला वर्षभर कोरोना संसर्गाच्या महत्तम लाटेमध्ये प्रतिबंधित क्षेत्राच्या रस्त्यावर उभे राहून दिवस-रात्र पोलिसांनी काढली. वर्षभर आंतरजिल्हा व राज्य ...
नाही म्हणायला वर्षभर कोरोना संसर्गाच्या महत्तम लाटेमध्ये प्रतिबंधित क्षेत्राच्या रस्त्यावर उभे राहून दिवस-रात्र पोलिसांनी काढली. वर्षभर आंतरजिल्हा व राज्य सीमांवर निगरानी देत ये-जा करणाऱ्यांच्या तपासणीत पोलीस कर्मचारी व्यस्थ होते. कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी कायदा व सुव्यस्थेचाही प्रश्न निर्माण झाला होता. बुलडाणा शहरात तर कोरोनाबाधित व संशयित मृतकांचे अंत्यसंस्कार कोठे करावे या मुद्द्यावरून पोलीसविरूद्ध समाज एकमेकांसमोर उभे ठाकले होते. याप्रकरणात पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे थेट एसडीपीअेा, एसडीअेा, ठाणेदार, तहसीलदारांना थेट पोलीस ठाण्यात येऊन नागरिकांची बैठक घ्यावी लागली होती. त्यामुळे पोलिसांवर मोठा ताण आला होता. अखेर हे प्रकरण सामंजस्याने मिटले. मात्र कोरोना संसर्गामुळे पोलिसांवर खऱ्या अर्थाने ताण वाढला होता. पहिल्या फळीत पोलिसांना आरोग्य विभागासोबत राहून काम करावे लागले होते.
दरम्यान, कोरोना संसर्गामुळे नागरिकांनाही सुरक्षित शारीरिक अंतर राखणे, मास्क वापरणे तथा गर्दीची स्थळे टाळण्याची बऱ्यापैकी सवय लागली. हॉटेल व्यावसायिकांसाठीही थर्टी फर्स्टच्या दिवशी वेळ वाढवून देण्यात आली नव्हती. तसेच जिल्हा प्रशासनाने गर्दी करण्याचे टाळण्याबाबत तथा धार्मिक, सार्वजनिक सोहळे घेण्यास परवानगी नाकारलेली होती. त्यामुळे पोलिसांना नेहमीच्या तुलनेत कमी ताणाचा गेला. त्यातच गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना असल्याने मद्यपींचेही प्रमाण तुलनेने कमी दिसले.
४६१ वाहनांवर कारवाई
जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या दिवशी जवळपास ४६१ जणांवर वाहतूक शाखेने कारवाई करत त्यांच्याकडून ४१ हजार ४०० रुपयांचा दंड जागेवरच वसूल केला. दरवर्षी हा आकडा अधिक असतो. यामध्ये वेगात वाहन चालविणे, वाहनाचा परवाना जवळ न बाळगणे, सीटबेल्ट न वापरणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा कारणावरून दंड ठोठावण्यात आला. वाहतूक शाखेचे ३५ पोलीस कर्मचारी या कामी जिल्ह्यात तैनात होते.
मद्यप्राशन केलेल्या तिघांवर कारवाई
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या तिघांवर वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी कारवाई केली. दरवर्षीच्या तुलनेत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या पाहता यंदा ही संख्या तुलनेने कमी आहे.