अंतिम प्रवासातही वादाचे काटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:54+5:302021-03-26T04:34:54+5:30
सिंदखेड राजा: जीवनाचा अंतिम क्षण सुखात जावा, अशी सर्वांचीच इच्छा असते; मात्र या अंतिम प्रवासातही वादाचे काटे आजही अनेक ...
सिंदखेड राजा: जीवनाचा अंतिम क्षण सुखात जावा, अशी सर्वांचीच इच्छा असते; मात्र या अंतिम प्रवासातही वादाचे काटे आजही अनेक ठिकाणी बोचत आहेत. हे वास्तव नाकारून चालणार नाही. तालुक्यातील अनेक गावात स्मशानभूमी किंवा अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मोठी अडचण होत आहे. चिंचोली जहागीरनंतर आता चांगेफळ येथील स्मशानभूमीचे प्रकरण गाजत आहे.
सिंदखेड राजा तालुक्यात शंभरपेक्षा जास्त गावे आहेत. मोठी गावे सोडल्यास आजही ग्रामीण भागात स्मशानभूमीसाठी निश्चित जागा नाही, तर अनेक ठिकाणी स्मशान भूमीचे शेड नाही. स्मशानुभूमीच्या कारणावरून होणारे वाद, विवाद, हाणामाऱ्या या ग्रामीण भागासाठी किंबहुना जेथे स्मशानभूमी किंवा स्वतंत्र जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी हे वाद नित्याचेच झाले आहेत. चांगेफळ तालुक्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या चांगेफळ येथील एका समाजाच्या स्मशानभूमीचा वाद सध्या पेटलेला आहे. येथील एका समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याने ग्राम पंचायतीने पुढाकार घेऊन हे अतिक्रमण काढण्यासाठी तालुका दंडाधिकारी यांच्याकडे पोलीस बंदोबस्त मागितला होता. १६ मार्च रोजी तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्त पुरवीत असल्याचे पत्र ग्राम सचिवांना पाठविले; मात्र १७ मार्च रोजी संबंधित अतिक्रमणधारकाने अतिक्रमण हटविण्याच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज करून त्यांचा स्थगिती आदेश मिळविला. त्यामुळे तेथील अतिक्रमण आजही ‘जैसे थे’ आहे. यासंदर्भात आता ग्राम पंचायतीने कायदेशीर मार्ग स्वीकारला असून, स्थगिती आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
चार दिवसात पाच लाख रुपयांचा निधी कसा करणार खर्च
राहेरी येथील स्मशानभूमीच्या विकासासाठी मार्च २०२१ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात पाच लाख रुपयांची तरतूद झाली होती. निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करायचा होता; परंतु गावातील राजकारण येथेही आडवे आले आणि स्मशानभूमीचा विकास ठप्प झाला. येत्या चार दिवसात पाच लाख रुपयांचा निधी खर्च करणे शक्य नाही, त्यामुळे येथील स्मशानभूमीचे भिजत घोंगडे कायम आहे.
याठिकाणी येताहेत अडचणी
चांगेफळसह सोनशी येथेही एका विशिष्ठ समाजाला स्मशानभूमी नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
चिंचोली जहागीर येथे दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमीवरून मोठा वाद झाला. या वादात पोलिसांना पाचारण करावे लागले. राहेरी येथेही स्मशानभूमीची निश्चित जागा नाही. येथील सरकारी जमिनीवर स्मशानभूमी आहे.