पहिल्या डोससाठी आलेल्यांना लस मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:35+5:302021-06-09T04:42:35+5:30
पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला बुलडाणा: यंदा मृग नक्षत्राला सुरूवात होण्यापूर्वीच जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. जूनचा पहिला आठवडा पावसाच्या हजेरीत ...
पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला
बुलडाणा: यंदा मृग नक्षत्राला सुरूवात होण्यापूर्वीच जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. जूनचा पहिला आठवडा पावसाच्या हजेरीत गेल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे शेतातील पेरणीपूर्व कामेही आता अंतिम टप्प्यात आली आहेत. बहुतांश ठिकाणी वखरण पाळीचे काम पूर्ण झाले आहे.
वादळामुळे महावितरणचे नुकसान
बुलडाणा: मे महिन्यात झालेल्या वादळामुळे महावितरणचे नुकसान झाले आहे. बुलडाणा विभागात उच्च दाब विद्युत वाहिनीचे २६ सिमेंट खांब पडून २.१ लाखांचे नुकसान झाले. १७ लाेखंडी खांब जमीनदोस्त झाल्याने १.७५ लाखाचे नुकसान झाले.
मोफत जेवणाची सुविधा थांबली
मेहकर: कोराेना बाधित रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी झाले आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देणाऱ्या विविध सामाजिक संघटनांनीही आपली सुविधा थांबवल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात अनेक संघटनांकडून मोफत जेवणाचे डबे देण्यात येत होते.
फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न
बुलडाणा: फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नुकसान झालेल्या फळबागांचा पीक विमा मंजूर करून देण्यात यावा, अन्यथा बँकेचे पीक कर्ज भरता येणार नाही व नवीन पीक कर्ज बँक देणार नाही, असा मुद्दा शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
वन्य प्राण्यांची तहान भागविणे कठीण
लोणार: सर्वत्र पाणीटंचाईचे संकट वाढत आहे. वन्य प्राण्यांची पाण्यासाठी तळमळ सुरू आहे. अनेक ठिकाणी तर भरवस्तीत पाण्यासाठी माकडे आल्याचे दिसून येते. लोणार सरोवर येथील एका थंड पाण्याच्या कुंडात तहान भागविण्यासाठी माकड उतरल्याचे दिसून आले.
शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव
बुलडाणा : अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका नगरपरिषद शाळा व दिव्यांग शाळा यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या शाळांना अनुदान उपलब्ध करण्याची गरज आहे.
नद्यांचे प्रदूषण वाढले
बुलडाणा : नऊ हजार ६६१ चौ.किमी विस्तार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने जल, वायू प्रदूषणाची समस्या डोके वर काढत आहे. त्यामुळे ते रोखण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनसामान्य असा त्रिवेणी संगम होणे आज गरजेचे झाले आहे. नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
खत, बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग
नायगाव दत्तापूर : पेरणीचे दिवस पाहता बी-बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. पेरणीचे दिवस जवळ आले आहे. तरी बी-बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी दिसत आहे.
अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले
सिंदखेड राजा: शहरातील काही प्रभागामध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे. या अस्वच्छतेमुळे मच्छरांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या कडेलाच कचरा फेकून दिल्या जात असल्याचे दिसून येते.
गतिरोधकाला पांढरे पट्टे न मारल्याने अपघात
मेहकर : मेहकर ते मालेगाव रोडवर असलेल्या काही फाट्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावतात. तर काही ठिकाणी गतिरोधक असूनही त्याला पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लहान मोठे अपघात होण्यासाठी पांढरे पट्टे न मारलेले गतिरोधक कारणीभूत ठरत आहेत.
नवीन जलवाहिनीने सोडविली पाण्याची समस्या
दुसरबीड : तीव्र पाणीटंचाई पाहता अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने तात्पुरत्या पूरक योजनेतून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील काही गावाची पाणी समस्या सोडविण्यासाठी नवीन जलवाहिनी महत्त्वाची ठरत आहे.