मास्क न वापरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:02 PM2021-06-07T12:02:28+5:302021-06-07T12:03:04+5:30
Buldhana News : त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यास तब्बल चार महिने जेरीस आणल्यानंतर आता कुठे कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन न केल्यास पुन्हा कोरोनाच्या लाटांचा सामना सर्वांनाच करावा लागणार आहे. परिणाम स्वरूप कोराना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
त्यासाठीचा ॲक्शन प्लान जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपूते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना त्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालायत ५ जूनला नियोजन सभागृहात कोरोना प्रतिबंध आढावा बैठकीत अनुषंगिक विषयान्वये त्यांनी हे निर्देश दिले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यास तिसऱ्या लाटेचा फटका बसण्यास प्रारंभ झाला होता. चालू वर्षात गेल्या पाच महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात ७१ हजार १७० व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जून महिन्यात हा आकडा घसरला असला तरी कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण हे कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन न करणे हेच आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी तथा तत्सम ठिकाणी शारीरिक अंतराचे पालन करणे आणि नियमित हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचा विसर पडल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला होता.५ जूनच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याची जाणीव उपस्थित अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा करून दिली आणि त्यानंतर येत्या काळातील कोरोनाच्या लाटा जर रोखायच्या असतील तर कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीची सार्वजनिक ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी होते की नाही यासाठी ॲक्शन प्लान तयार करण्यात यावा. सोबतच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह अन्य काही कारवाई करता येते का? याचा आढावा घेऊन तसे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे तिन्ही अधिकारी याबाबत काय नियोजन करतात याकडे सध्या लक्ष लागून आहे.