तुझं माझं जमेना म्हणणारे पुन्हा लागले नांदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:12+5:302021-09-22T04:38:12+5:30
बुलडाणा : आता तुझं माझं जमतच नाही. आपण एकत्र राहू शकतच नाही, असे म्हणत बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल ४४६ जोडप्यांनी ...
बुलडाणा : आता तुझं माझं जमतच नाही. आपण एकत्र राहू शकतच नाही, असे म्हणत बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल ४४६ जोडप्यांनी महिला व बाल अत्याचार प्रतिबंध कक्षाची पायरी चढली. यामध्ये भरोसा सेलला १३४ प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले आहे. तेव्हा सध्या तुझं माझं जमेना म्हणणारे १३४ जोडपे पुुन्हा नांदू लागल्याचे दिलासादायक चित्र आहे.
कोरोना आणि कोरोनानंतरच्या काळात कुटुंबातील पती-पत्नीमध्ये खटके उडाल्याचे दिसून आले आहेत. अनेकजणांनी आता विलग होणे हाच एक पर्याय असल्याचे म्हणत सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतल्यानंतरही काहींनी सात महिन्यांनंतर तर काही सात वर्षांनंतर काडीमोड करणे हाच एक पर्याय निवडला. याचमुळे येथील भरोसा सेलमध्ये २० सप्टेंबर २०२० ते २० सप्टेंबर २०२१ या दरम्यान ४४६ प्रकरणे दाखल झाली होती. यामध्ये भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक रिना कोरडे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या जोडप्यांना योग्य ते समुपदेशन करून त्यांच्यामध्ये समेट घडवून आणला.
ही आहेत कौंटुबिक वादाचे कारणे
बुलडाणा जिल्हा हा ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जातो. या जिल्ह्यातील कौंटुबिक वादाचे कारणेही शहरांच्या तुलनेत वेगळीच आहे. नवरा दारू पितो, घरी काही कमावून आणून देत नाही, तर ही न सांगता माहेरी निघून जाते, पत्नीला एकत्र परिवार नको, सोबतच शहरातच राहायला चला ही आणि इतर कारणे पती-पत्नीमध्ये खटके उडवित आहेत.
भरोसा सेलची ही टीम करते जोडप्यांचे समुपदेशन
भरोसा सेलमध्ये पोलीस उपनिरीक्षक रिना कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रिया उमाळे, एएसआ. अलका वाघमारे, महिला हेड कॉन्स्टेबल कल्पना गवई, सूर्यकुमार साबळे, कविता मोरे, केशव नागरे, प्रभू परीहार, महिला पोलीस कॉन्स्टेबल शितल मापारी, साधना गवई, वैशाली लोखंडे, शुभांगी धनावत ही सगळी टीम जोडप्यांचे समुपदेशन करीत आहेत.
जिल्ह्यात या पोलीस ठाण्यात आहे कक्ष
जिल्ह्यात खामगाव, बुलडाणा आणि मेहकर या तीन ठिकाणी महिलांसाठी भरोसा सेल उभारण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशनमध्ये महिला साहाय्य कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे महिलांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
पीडित महिलांनी घाबरून न जाता भरोसा सेलमध्ये यावे, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची पडताळणी करून त्यांना सुरक्षेचा ‘भरोसा’ देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे.
-रिना कोरडे, पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल