राज्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:31+5:302021-07-07T04:42:31+5:30
एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रखडल्या : विद्यार्थी संतप्त, आंदोलनाच्या पवित्र्यात बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी ...
एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रखडल्या : विद्यार्थी संतप्त, आंदोलनाच्या पवित्र्यात
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, घेण्यात येणाऱ्या परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत.
कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील २ ते ३ वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावय आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेची स्थिती
राज्य सेवा परीक्षा चारवेळा पुढे ढकलण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मार्च २०२१ मध्ये पूर्वपरीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत निकाल लागलेला नाही. संयुक्त पूर्वपरीक्षा पाचवेळा पुढे ढकलण्यात आली. मागील १८ महिन्यांपासून परीक्षा झाली नाही. आरटीओची पूर्वपरीक्षा होऊन दीड वर्ष झाले. अजूनही निकाल लागलेला नाही. सहा. वनसंरक्षकाच्या परीक्षेचा अंतिम निकाल गेल्या वर्षभरापासून लागलेला नाही. वर्ग क च्या मंत्रालयीन पदांकरिता २ वर्षांपासून जाहिरात नाही. कर सहायक, महिला व बाल कल्याण अधिकारी या पदाकरिता तीन वर्षांपासून जाहिरात नाही. स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत ३,६०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडलेल्या आहेत. कृषी विभागातील पदभरती रखडलेली आहे. पीएसआय पदासाठी, शारीरिक चाचणी दीड वर्षापासून झालेली नाही.
...............प्रतिक्रीया.........
विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य
गत २०१६ पासून एमपीएससीची तयारी सरू केली. दहा दहा तास अभ्यास केला आहे. यंदा नक्कीच मेन्स क्लिअर होईल याचा आत्मविश्वास आहे. परंतु एमपीएससीने परीक्षेची तारीख काही जाहीर केली नाही. परिश्रम घेऊनही परीक्षाच हाेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले आहे.
-निकिता निरमल, विद्यार्थिनी
परीक्षा होत नसल्या तर मुलांचे वय निघून जात आहे. परीक्षेच्या तयारीसाठी ते दुसरे जॉब करीत नाही. यासाठी सरकार आणि एमपीएससीही जबाबदार आहे. एमपीएससी आपल्या निर्णयावर ठाम नाही. सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याची गरज आहे.
- सागर अवातीरक, विद्यार्थी
................बॉक्स.............
राज्य लोकसेवा आयोगात सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या
मागील तीन वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगात सदस्यांची नियुक्ती केली नाही. सध्या ६ पैकी २ सदस्य कार्यरत आहेत. मागील सरकारने आणि आताच्याही सरकारने सुद्धा याकडे दुर्लक्षच केले आहे. दोनपैकी एक सदस्य लवकरच निवृत्त होणार आहे. त्याचा परिणाम एमपीएससीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांवर होत आहे.
एमपीएससीच्या परीक्षाच हाेत नसल्याने अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत़ काेराेनामुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बंद आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ सध्या आली आहे. या संचालकांच्या मार्गदर्शन केंद्रांचा व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये सामावेश करावा व व्यावसायिक दर्जा प्राप्त करून द्यावा.
प्रा. डॉ. नितीन रामप्रसाद जाधव
संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र
१६ महिन्यांपासून सर्व खासगी क्लासेस, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सरकारच्या नियमानुसार बंद आहे, आम्ही सर्व शिक्षकांनी क्लासेस अभ्यासिका करीता हॉल भाड्याने, घरभाडे, कर्जाचे हप्ते हे मात्र सर्व चालूच आहे. त्याला लाकडाऊन नाही, काही शिक्षकांनी आपले फर्निचर विकले, ८० टक्के शिक्षकांनी हाॅल सोडून दिले, काही शिक्षकांनी भाजीपाल्याची, शेतात मजुरी, इ. कामे करून आपलं कुटुंब जगवत आहेत.
प्रा. दीपक चाटे, केंद्रसंचालक