वाघांच्या शिकारीचा धोका; महागिरी महादेव यात्रेला सशर्त परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 05:44 PM2023-08-31T17:44:35+5:302023-08-31T17:45:13+5:30
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून १५ किमी अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अंबाबरवा अभयारण्यातील अतिसंरक्षित गाभा (कोर) क्षेत्रात महागिरी येथे एका पर्वतावर महादेवाचे अधिष्ठान आहे.
अझहर अली
संग्रामपूर (बुलढाणा) : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून वाघांच्या शिकारीच्या घटनांबाबत महाराष्ट्र राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना (रेड अलर्ट) धोक्याचा इशारा देण्यात आहे. विदर्भातील अभयारण्यात वाघांची शिकार करणारी बावरीया जमातीची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट अंबाबरवा अभयारण्यातील अतिसंरक्षित गाभा (कोर) क्षेत्रात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महागिरी महादेव येथील यात्रेस येणाऱ्या भाविकांना विविध निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे, यात्रेला वन्यजीव विभागाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून १५ किमी अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अंबाबरवा अभयारण्यातील अतिसंरक्षित गाभा (कोर) क्षेत्रात महागिरी येथे एका पर्वतावर महादेवाचे अधिष्ठान आहे. ४ सप्टेंबर रोजी येथे यात्रा भरणार आहे. तेथे पंचक्रोशीसह इतर ठिकाणांवरून येणाऱ्या भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाने अटीशर्तीसह भाविकांना महादेवाच्या दर्शनासाठी परवानगी दिली आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भक्तांना शेंबा तपासणी नाक्यापर्यंत वाहनाने जाता येईल. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे. येथून पुढे अभयारण्यात महादेवाच्या पर्वतापर्यंत भाविकांना पायी जावे लागणार आहे.
अभयारण्यात यात्रेदरम्यान ढोल, ताशे, डफळे, ध्वनिक्षेपक इतर वाद्यांसह तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, मद्य, तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र सोबत नेण्यास बंदी आहे. अभयारण्यात प्लास्टीक पिशवी, पाणी बॉटल तसेच प्लास्टीकचे कुठलेही साहित्य वापरण्यास मनाई आहे. महागिरी येथील महादेवाचे मंदिर सोडून अभयारण्यात इतर ५० मीटरच्या भागात जाण्यास मज्जाव केला आहे. बंदी घातलेल्या वस्तू, साहित्य आढळल्यास जप्त केल्या जातील, असे सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय (वन्यजीव)कडून बजावण्यात आले.
महाराष्ट्रात टोळी सक्रिय
जुलै २०२३ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून वाघांच्या शिकारीच्या घटनांबाबत महाराष्ट्र राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना (रेड अलर्ट) धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार व्याघ्र प्रकल्पांतर्गत व नजीकच्या क्षेत्रात वन्यजीव विभागाकडून सक्त कारवाईचा आदेश आहे.
श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी यात्रेला सशर्त परवानगी आहे. भाविकांनी सूचनांचे पालन करावे, बंदी असलेल्या ठिकाणी जाऊ नये, तसेच बंदी असलेले साहित्य सोबत ठेवू नये.
सुनील वाकोडे
वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)