बुलडाणा जिल्ह्यातील मोठे प्रकल्प तहानलेलेच!
By admin | Published: June 30, 2017 12:02 AM2017-06-30T00:02:15+5:302017-06-30T00:02:15+5:30
जिल्ह्याचा काही भाग सोडला, तर अजूनही पाऊस सर्वसाधारणच पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.
ओमप्रकाश देवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : दमदार पावसाची अपेक्षा असतानाही जिल्ह्याचा काही भाग सोडला, तर अजूनही पाऊस सर्वसाधारणच पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी केली असता काही भागात पिके जोमात असून, या पिकात आंतरमशागतीची कामे सुरु आहेत.
जिल्ह्यात पावसाने मृग नक्षत्रात चांगली सुरुवात केली. मात्र, सार्वत्रिक पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या काही दिवसांच्या फरकाने मागेपुढे झाल्या आहेत. मेहकर तालुक्यात सर्वसाधारण पाऊस असला, तरी पिके चांगलीच तग धरुन आहेत. यामध्ये काही शेतकरी तण नियंत्रणासाठी निंदण करीत आहेत, तर काही तणनाशकाची फवारणी करीत आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी डवरणी सुरु केली आहे. मेहकर तालुक्यात २०१६-१७ मध्ये याच दिवशी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१७-१८ मध्ये आजपर्यंत २६५ मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसाने खरिपाची पेरणी साध्य झालेली असून, काही ठिकाणी कमी काळात जास्त पाऊस झाल्याने पेरणी उलटली आहे. जास्त पावसामुळे बियाणे उगवलेच नसल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
या पावसाने लघू जलसाठे जरी भरले असले, तरी जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत. यामध्ये मोठे प्रकल्प नळगंगा या प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित साठा ६९.३२ दलघमी असून, आजचा पाणीसाठा १३.८२ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी १९.९४ आहे. याचप्रमाणे पेनटाकळी प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित साठा ५९.९७ दलघमी असून, आजचा पाणीसाठा ४.६५ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी ७.७५ टक्के आहे.
खडकपूर्णा प्रकल्पाचा प्रकल्पीय साठा ९३.४० दलघमी असून, आजचा पाणीसाठा ६.२६ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी ६.७० टक्के आहे. याचप्रमाणे मध्यम प्रकल्प पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी या प्रकल्पातील आजरोजी संचित जलसाठ्याची स्थिती जेमतेम अशीच आहे.
जिल्ह्यातील अनेक मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेले असल्याने संकल्पित प्रमाणानुसार जलसाठे भरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे.
सध्याच्या पावसावर पीक परिस्थिती समाधानकारक
जिल्ह्यात पाऊस सर्वत्र समप्रमाणात पडलेला नसला, तरी पिकांना सद्यस्थितीत तग धरुन ठेवण्यासाठी लागणारा पाऊस मात्र जवळपास प्रत्येक तालुक्यात पडलेला आहे. त्यामुळे सध्याच्या पावसावर जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, जलसाठे व पुढील पीक वाढीसाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे.