तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: June 20, 2017 04:35 AM2017-06-20T04:35:05+5:302017-06-20T04:35:05+5:30
अवैध सावकारी; उटी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : व्याजाच्या पैशांच्या तगाद्यापायी आत्महत्या केलेल्या उटी येथील शेतकर्यांच्या मृत्यूस कारणीभूत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आज १९ जून रोजी त्यांच्याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यातील उटी येथील राजू विक्रम हरमकर (वय ४५) या शेतकर्याने १८ जून रोजी स्वत:च्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. अवैध सावकारांच्या पैशांचा तगादा तसेच मानसिक त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याची तक्रार मृत शेतकर्याची पत्नी सुलोचना राजू हरमकार यांनी जानेफळ पोलिसात केली. गावातील शिवाजी लक्ष्मण आंधळे, रंजन वडाळकर व नंदू निकस या तिघांकडून होणार्या मानसिक त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याच्या लेखी तक्रारीनंतर जानेफळ पोलिसांनी शिवाजी लक्ष्मण आंधळे, रंजन भिमाशंकर वडाळकर व नंदु ऊर्फ सदानंद ङ्म्रीकांत निकस या तिघांविरुद्ध १८ जून रोजी कलम ३0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता, तर आज १९ जून रोजी सदर गुन्हय़ासह तिन्ही आरोपींवर अवैध सावकारीप्रकरणी कलम ३२ बी, ३३ मुंबईनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.