खामगाव कृउबासमध्ये तीन महिन्यांत तीन प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:57 AM2021-01-05T11:57:31+5:302021-01-05T11:58:34+5:30
Khamgaon APMC प्रशासकीय कारण दिले जात असले तरी यामागे राजकीय किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन महिन्यात तीन संचालक बदलले आहेत. याला प्रशासकीय कारण दिले जात असले तरी यामागे राजकीय किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत घाटाखालील सहा तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या समितीचा कारभार सुरळीत चालावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, तीन महिन्यातच तीन प्रशासक बदलण्यात आले आहेत.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासकाची नियुक्ती झाली. परंतु या बाजार समितीत राजकीय वर्चस्वाची लढाई मात्र संपलेली नाही.
त्यामुळेच गेल्या ३ महिन्यात तीन प्रशासक बदलण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसच्या अधिपत्याखाली होती.
सभापतीपदी संतोष टाले यांची निवड करण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच संतोष टाले यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कारभाराच्या तक्रारी केल्या. यादरम्यानच जुलै २०२० मध्ये संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला.
परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दीड महिना मुदतवाढ मिळून संचालक मंडळ ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कार्यमुक्त झाले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक यांनी १ सप्टेंबर २०२० रोजी या कृउबासवर प्रशासक म्हणून विशेष लेखा परीक्षक वर्ग २ (पणन) सहकारी संस्था बुलडाणा दिलीप जाधव यांची नियुक्ती केली. त्यानंतर १५ दिवसांच्या आतच जाधव यांची प्रशासक पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली.
त्यानंतर सहा. निबंधक सहकारी संस्था खामगाव ओ. एस. साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी साळुंखे यांची नियुक्ती रद्द करीत सहा. निबंधक सहकारी संस्था मलकापूर एम.ए. कृपलानी यांची निुयक्ती केली. प्रशासकीय कारणास्तव ही नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते.