साडेतीन लाख शेतकरी ई पीक पाहणीपासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:11+5:302021-09-15T04:40:11+5:30
संदीप वानखडे बुलडाणा : शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पिकाची नाेंद करण्याची सुविधा शासनाने सुरू केली आहे. त्यासाठी ॲपही विकसित करण्यात आले ...
संदीप वानखडे
बुलडाणा : शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पिकाची नाेंद करण्याची सुविधा शासनाने सुरू केली आहे. त्यासाठी ॲपही विकसित करण्यात आले आहे. मात्र, नेटवर्कसह अनेक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३ लाख ८९ हजार शेतकरी ई पीक नाेंदणीपासून दूरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ई पीक पाहणीसाठी प्रशासनाने आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर पीक नाेंद करता यावी, यासाठी शासनाच्या वतीने ई पीक नाेंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ॲपही विकसित करण्यात आले आहे. मात्र, ॲप सुरूच हाेत नसल्याने तसेच विविध कारणांमुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी नाेंदणीच करू शकले नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात पीक घेणारे ५ लाख ४१ हजार २४ शेतकरी आहेत, तसेच रब्बी हंगामात शेती करणारे एकूण २ लाख ५० हजार २७५ शेतकरी आहेत. एकूण ७ लाख ९१ हजार २९९ शेतकऱ्यांची नाेंद आहे. त्यापैकी ३३ टक्के शेतकऱ्यांनीच नाेंदणी केली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत केवळ २ लाख शेतकऱ्यांनीच नाेंदणी केली आहे. यातील १ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी पिकाची नाेंद केली आहे, तर १२ हजार ४७६ शेतकऱ्यांनी पिकाची नाेंदणी केलेली नाही.
शेगाव तालुक्यात सर्वांत कमी नाेंदणी
जिल्ह्यात १३ तालुक्यांपैकी सर्वांत कमी नाेंदणी शेगाव तालुक्यात झाली आहे. शेगावमध्ये केवळ २०.३० टक्के शेतकऱ्यांनीच ई पीक नाेंदणी केली आहे, तसेच देऊळगाव राजा तालुक्यात २०.३५, लाेणार तालुक्यात २४.४८, सिंदखेड राजा तालुक्यात २७. ६० टक्के, मलकापूर तालुका २७.८५, मेहकर २८.१६, माेताळा २९. २४ टक्के शेतकऱ्यांनीच नाेंदणी केली आहे. इतर शेतकरी अजूनही नाेंदणीपासून दूरच आहेत.
जळगाव जामाेद तालुका जिल्ह्यात प्रथम
ई पीक पेरा नाेंदणीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. या तालुक्यातील नाेंदणी केलेल्यांपैकी ५१.१५ टक्के शेतकऱ्यांनी पिकाची नाेंद केली आहे. त्यानंतर खामगाव तालुक्यात ४७.७७ , चिखली ४३.९२, बुलडाणा 3९.३२, नांदुरा ३६.3२, संग्रामपूर तालुक्यात ३४.४५ टक्के शेतकऱ्यांनी पीक नाेंदणी केली आहे.
या आहेत अडचणी
अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड माेबाईलच नाहीत
ॲप चालवण्याची माहिती नसणे
महसूल विभागाकडून माेजक्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन
ग्रामीण भागात नेटवर्कच राहत नाही
पीक नाेंदणी करण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेले ॲप चालवता येत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत, तसेच महसूल विभागाच्या वतीने माेजक्याच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्वच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड माेबाईल नाही.
भालचंद्र वानखडे, शेतकरी.