साडेतीन वर्षीय चिमुकलीची कर्करोगाशी झुंज!
By admin | Published: October 28, 2016 02:42 AM2016-10-28T02:42:57+5:302016-10-28T02:42:57+5:30
प्रांजलच्या उपचारासाठी शेळके कुटुंबीयांची मदतीची याचना.
देऊळगाव मही, दि. २७- खेळण्याचं, बागडण्याचं, हसण्याच्या वयात प्रांजलला कर्करोगासारख्या भीषण आजाराने ग्रासले असून, तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या शेळके कुटुंबीयांना मदतीची गरज आहे.
सुरेश शेळके हे मूळचे शिरपूर येथील रहिवासी असून, काही वर्षांंपूर्वी उदरनिर्वाहासाठी देऊळगाव मही येथे स्थायिक झाले. ते येथे संगणक प्रशिक्षण केंद्र चालवितात. जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर सर्व आर्थिक संकटावर मात करत त्यांनी आपला व्यवसाय तसेच संसाररुपी गाडा सुरळीत सुरू केला. प्रांजल एकुलती एक कन्या असल्याने शेळके कुटुंबीयांनी विविध स्वप्ने रंगवायला सुरुवात केली. तिला सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही येथे प्री-प्रायमरी नर्सरी शाळेत टाकण्यात आले. काही दिवसांपूर्वी प्रांजलला ताप येत असल्याने चिखली तसेच बुलडाणा येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र, निदान न झाल्याने त्यांनी औरंगाबादला धाव घेतली. येथील डॉक्टरांनी त्यांना टाटा मेमोरियल जाण्यास सांगितले.
डॉक्टरांनी त्या ठिकाणी ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान केले असून, चिमुकली प्रांजल किमोथेरपीच्या वेदना सहन करीत आहे. शेळके कुटुंबीयांची सर्वसाधारण परिस्थिती हलाखीची आहे.
डॉक्टरांनी उपचारासाठी कमीत कमी खर्च पाच लाख रुपये सांगितला असून, या कुटुंबीयापुढे आ िर्थक संकट कोसळले आहे. प्रांजल जीवन मरणाच्या उंबरठय़ावर उभी आहे. समाजातील दानशूरांनी मदत केल्यास मृत्यूच्या दाढेतून तुमच्या अल्पशा मदतीने चिमुकलीची सुटका होऊ शक ते.
दिवाळीची अल्पशी भेट प्रांजलला देईल जीवनदान
समाजातील दानशूर व्यक्ती, विविध सामाजिक संस्था तसेच असंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी अनावश्यक खर्च टाळून दिवाळी सणाच्या पर्वावर अल्पशी आर्थिक भेट दिल्यास जीवन-मरणाच्या उंबरठय़ावर असलेल्या प्रांजलला जीवनदान मिळू शकते. तसेच सर्व स्तरातून मदत करण्याचे आवाहन होत आहे.