‘समृद्धी’वर जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक; ६.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By निलेश जोशी | Published: August 29, 2023 04:36 PM2023-08-29T16:36:22+5:302023-08-29T16:37:38+5:30

आरोपी जालना व छत्रपती संभाजीनगरमधील

Three arrested for forcible theft on Samruddhi highway; 6.83 lakhs worth of goods seized | ‘समृद्धी’वर जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक; ६.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘समृद्धी’वर जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक; ६.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर वाहन चालकांना अडवून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपी हे जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. दरम्यान या आरोपींच्या अटकेमुळे समृद्धी महामार्गावर किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी झालेल्या जबरी चोरीच्या घटनेचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.

गजानन भगवान जाधव (२२, रा. भिवपूर, जि. जालना), अनिल पवार (रा. तिसगाव, छ. संभाजीनगर) आणि राजेश सुरेश गवळी (३६, रा. छपन्ननगर, मुकूंदवाडी, छ. संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात येत असलेल्या उमरखेड येथील बाबुराव फुके हे समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे त्यांच्या वाहनाद्वारे जात होते. मेहकर टोल नाक्यानजीक तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या वाहनासमोर गाडी आडवी लावली. फुके यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील एक लाख २० हजार रुपये रोख व मोबाईल, असा १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. प्रकरणी फुके यांनी २४ ऑगस्ट रोजी याप्रकरणी मेहक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

दरम्यान २६ ऑगस्ट रोजी गोपनिय माहितीच्या आधारावर एलसीबीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून गजानन भगवान जाधव आणि अनिल पवार यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरमयान त्यांच्या तिसऱ्या सहकाऱ्यास छत्रपती संभाजीनगर मधून ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींकडून एक लाख ४० हजार रुपयांचे १४ मोबाईल, पाच लाख रुपयांची कार आणि ३५ हजार रुपये रोख, चांदीचे आठ हजार रुपयांचे दागिने असा ६ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २८ ऑगस्ट रोजी ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी समृद्धी महामार्गावर यापूर्वीही काही गुन्हे केले आहेत. ते उघड होण्यासोबतच अन्यत्रही काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलासकुमारसानप, श्रीकांत जिंदमवार, सचिन काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Web Title: Three arrested for forcible theft on Samruddhi highway; 6.83 lakhs worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.