वाघ-बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:24 AM2021-07-15T04:24:11+5:302021-07-15T04:24:11+5:30
दरम्यान, तपासाचा भाग म्हणून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वन विभागाने गुलदस्त्यात ठेवली आहेत. वाघ व बिबट्यांना ठार मारून ...
दरम्यान, तपासाचा भाग म्हणून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वन विभागाने गुलदस्त्यात ठेवली आहेत. वाघ व बिबट्यांना ठार मारून त्यांच्या मौल्यवान नखांची तस्करी बुलडाणा जिल्ह्यात होत असल्याची माहिती मुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो आणि अमरावती येथील मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेलला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील हनुमान मूर्ती परिसरात वाघ व बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना १३ जुलै रोजी सायंकाळी वन विभागाने सापळा रचून अटक केली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतातील वाघ व बिबट्याच्या अवयवांची मोठी किंमत मिळत असल्याने या शेड्यूल-१ मधील प्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव अवैधपणे विकले जातात. त्यामुळे या प्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वन विभाग व वन्यजीव विभाग अधिक संवेदनशील व सजग आहे. उपरोक्त स्वरूपाची माहिती मिळाल्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी व क्षेत्रीय निदेशक वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो (मुंबई) योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा येथील हनुमान मूर्ती परिसरात वन विभागाच्या पथकाने १३ जुलै रोजी सापळा रचला. या कारवाईत वाघ व बिबट्याची दहा नखे, एक दुचाकी व तीन मोबाइल जप्त करण्यात त्यांना यश आले. यातील दोन आरोपी जळगाव खान्देशमधील, तर एक आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील आहे.
--आरोपींना वन कोठडी--
अटक करण्यात आलेल्या तीनही आराेपींना नांदुरा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची १७ जुलैपर्यंत वन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सहायक वनसंरक्षक संदीप गवारे (मेहकर), सहायक वन संरक्षक रणजित गायकवाड (बुलडाणा), मुंबई येथील वाइल्ड लाइफ कंट्रोल ब्युरोचे अदिमलय्या, वन परिक्षेत्र अधिकारी के.डी. पडोळ, स्मिता राजहंस, गणेश टेकाळे, के.आर. मोरे, एस.एच. पठाण, आकाश सारडा, मुकेश जावरकर, जीवन दहीकर, रामेश्वर हाडे यांनी सहभाग घेतला. या वन गुन्ह्याचा तपास बुलडाणा येथील सहायक वनसंरक्षक रणजित गायकवाड व वनपरिक्षेत्र अधिकारी मोताला हे करीत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली.