तीन उमेदवारांना मिळाली सारखीच मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:08+5:302021-01-21T04:31:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोणगाव : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक १ मधील तीन उमेदवारांना एकसारखीच मते पडली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक १ मधील तीन उमेदवारांना एकसारखीच मते पडली आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने तिन्ही उमेदवारांना एकसारखीच म्हणजे २०१ मते पडली आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, नागापूर येथे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तीन उमेदवारांना एकसारखीच मते पडली आहेत. मतदान सुरू असताना मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली आहे. मतदान सुरू असतानाच मशीनचा आवाज बंद झाला होता. याबाबत मतदान प्रतिनिधींनी त्यावेळी संबंधितांना अवगतही केले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या मशीनबाबत कोणतीही चौकशी न करता मतदान प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे वरील सदस्यांना सारखी मते पडले आहेत. त्यामुळे मशीनमधील चीप काढून इतर योग्य मशीनमध्ये टाकून परत मतमोजणी करावी, अन्यथा मतदान प्रक्रियेविरोधात योग्य त्या न्यायालयात जाण्याचा इशारा नागापूर येथील अनिताताई लक्ष्मण जुनघरे यांच्यासह दोघांनी केली आहे.