बुलडाणा जिल्ह्यात प्रतिदिन तीन कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:52 AM2020-06-03T10:52:58+5:302020-06-03T10:53:04+5:30
प्रतिदिन सरासरी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका अधिक गडद झाला असून गेल्या नऊ दिवसात जिल्ह्यात तब्बल ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढलून आले आहेत. प्रतिदिन सरासरी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात हे संक्रमण दिसत असून आता मलकापूर शहर कोरोना संक्रमाचा हॉटस्पॉट बनले आहे. येथे सात दिवसात १२ कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने मलकापूर शहरासह ग्रामीण भागात सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६५ दिवसात ६९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. सरासरी प्रतिदिन एक असे जिल्ह्याचे प्रमाण वर्तमान स्थिती वाटत असले तरी गत नऊ दिवसाचा आढावा घेतला असता त्याचा वेग दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.
एकंदरीत ही स्थिती असली तरी कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात सुधारले असून ४९ टक्क्यांवरून ते ६१ टक्कयावर गेले आहे. मात्र कोरोना संसर्गाचा जिल्ह्या धोका कायम आहे. मलकापूर शहरातही काही संदिग्ध रुग्ण आढळून येत असून बॅकिंग क्षेत्राशी संबंधित एका व्यक्तीत संसर्गाची लक्षणे आढळून आल्याने संदिग्ध रुग्ण म्हणून त्यास एक जून रोजी बुलडाणा येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ६१ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचेप्रमाण ६१ टक्क्यांवर पोहोचले आहे. आधी ते ४९ टक्के होते. मंगळवारी सकाळी नऊ जणांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांचा आकडा हा ३३ वरून ४२ वर पोहोचला आहे. सध्या २४ कोरोना बाधीतांवर शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयात उपचार करण्यात येत असून रुग्णालयातील सर्व कोरोनाबाधीतांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार या रुग्णांना कुठलाही त्रास नसल्यास प्रसंगी त्यांची आयसोलेशन कक्षातून सुटी केल्या जावू शकते. त्यानुषंगाने मंगळवारी नऊ जणांना सुटी देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.