पांदण रस्त्यांसाठी तीन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 03:17 PM2020-01-12T15:17:13+5:302020-01-12T15:17:17+5:30
जिल्ह्यात १९१ किमीचे पांदण रस्ते बांधण्याचे उद्दीष्ट असून त्याची संख्या १८२ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्यास पांदण रस्ते निर्मितीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तालुकास्तरावर १ कोटी ७५ लाख ५० हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता व परतीच्या पावसामुळे पांदण रस्ते निर्मितीत निर्माण झालेले अडथळे आता दूर झाले असून कामे मार्गी लागली आहेत. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत ही कामे सुरू आहेत.
जिल्ह्यात १९१ किमीचे पांदण रस्ते बांधण्याचे उद्दीष्ट असून त्याची संख्या १८२ आहे. याबाबतचे कार्यारंभ आदेश पूर्वीच देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १२१ किमी लांबीची ७२ कामे सुरू आहेत. यापैकी ५२ किमी लांबीच्या ३७ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर २५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये बुलडाणा ६ लाख, चिखली १, मेहकर ०, लोणार ०, देऊळगावराजा ४ लाख २३ हजार, सिंदखेडराजा २ लाख ४४ हजार, मलकापूर ०, मोताळा ५ लाख ५४ हजार, नांदुरा ०, खामगाव ०, शेगाव ४.२५, संग्रामपूर ० तर जळगाव जामोद तालुक्यासाठी १ लाख २ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तर ९१ किमी लांबीच्या ५४ पांदण रस्त्यांचे काम सुरू आहे. त्याला ५९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत तालुकास्तरावर १ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यापैकी रस्त्याच्या कामावर २२ लाखांचा खर्च झाला आहे. वर्तमानस्थितीत १ कोटी ५३ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान शिल्लक आहे. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पांदण रस्त्यांचे काम रखडले होते. आता बांधकामातील सर्व अडथळे दूर झाले असून कामे मार्गी लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील बहुतांशी भागातील पांदण रस्त्यांचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे सुलभ होणार आहे. उर्वरीत कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावरील प्रशासनास सूचना दिल्या आहेत.
बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक काम
बुलडाणा तालुक्यातील २७ किमी लांबीच्या १३ कामांसाठी १३ लाख ५० हजारांच्या निधीचा कार्यारंभ आदेश निघाला होता. आतापर्यंत १३ किमी लांबीच्या ६ रस्त्यांचे काम पूर्णत्वास गेले असून यावर ६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत बुलडाणा तालुक्यातील सर्वाधिक रस्ते पूर्णत्वास गेले आहेत. इतर तालुक्यांमध्ये परतीच्या पावसामुळे काम रखडले होते. आता अडथळे दूर झाल्याने ही सर्व कामे सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहेत.