पोलिसांनी तीन दिवसांतच लावला चोरीतील आरोपींचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:28 PM2017-08-23T23:28:49+5:302017-08-23T23:28:52+5:30
मेहकर : स्थानिक दिवाणी कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या शे.इम्रान शे.गफुर यांच्या घरी १६ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. यामध्ये जवळपास ३ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या तीन दिवसांतच आरोपींचा शोध लावून चार आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : स्थानिक दिवाणी कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या शे.इम्रान शे.गफुर यांच्या घरी १६ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. यामध्ये जवळपास ३ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या तीन दिवसांतच आरोपींचा शोध लावून चार आरोपींना अटक केली आहे.
शे.इम्रान शे.गफुर हे १६ ऑगस्ट रोजी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी १६ ऑगस्टच्या रात्री कुलूप तोडून घरातील रोख १ लाख २५ हजार, सोन्याच्या दागिन्यांसह इतर दागिने अंदाजे १0 तोळे किंमत २ लाख २५ हजार व काही मोबाइल असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा माल लंपास केला होता. शे.इम्रान शे.गफुर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ४५७, ३८0 नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने, पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गौरीशंकर पाबळे, पो.काँ. शरद गिरी, अतुल पवार, उमेश घुगे, म्हस्के, अनिल काकडे यांनी आपली तपास चक्रे जलदगतीने फिरवून अवघ्या तीन दिवसांत चोरांचा छळा लावला.
गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे मेहकर येथील आरोपी शेख सलमान शेख शमीम, उमेरखान, दोस्त, मोहम्मद, मोईन, करामत खान, सर्व रा. दिवाणी कोर्टच्या पाठीमागे मेहकर व सुलतान शहा मंजुर शहा रा.हितेंद्र किराणाजवळ मेहकर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले.
सदर आरोपीकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी रोख २५ हजार रुपये, १ २५ ग्रॅम वजनाचा राणी हार, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ चांदीची अंगठी असा एकूण १ लाख १0 हजार रुपयांचा मुद्देमाल व गुन्हय़ात आरोपीने कुलूप तोडण्यासाठी वापरलेले हत्यार याप्रमाणे जप्त करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा, अपर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांनी मेहकर पोलिसांचे कौतुक केले आहे.