५० रुपयांची लाच घेताना दोन ट्रॅफिक पोलीसांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 07:00 PM2020-09-07T19:00:56+5:302020-09-07T19:41:06+5:30
बुलडाणा वाहतुक शाखेच्या तीन पोलिसांना अकोल्याच्या एसीबीच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी अटक केली.
बुलडाणा : मालवाहु वाहनाच्या चालकास ५० रुपयांची लाच मागणाºया बुलडाणा वाहतुक शाखेच्या दोन पोलिसांना अकोल्याच्या एसीबीच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी अटक केली.
सुरेश किसन कचरे, विशाल अशोक वारडेकर असे या ट्रॅफिक पोलीसहवालदारांचे नावे आहेत.
मलकापूर येथील फिर्यादी मलकापूर ते बुलडाणा गुरांची नियमीत वाहतुक करतात. बुलडाण्यात आल्यावर मलकापूर रस्त्यावर सुरेश कचरे व विशाल वारडेकर हे सगळे नेहमी वाहन अडवून या चालकांना त्रास देवून पैशाची मागणी करत होते. याप्रकरणी फिर्यादीने तक्रार एक महिण्यापूर्वी अकोला एसीबी यांच्याकडे दाखल केली होती. यावरून अकोला एसीबीने २६ आॅगस्ट रोजी पडताळणी केली होती.त्यावेळी खात्री पटल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ७ सप्टेंबर रोजी सापळा रचून दोन्ही पोलिसांना ५० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. दोन्ही पोलिसांना ताब्यात घेउन पुढील कारवाई करण्यात येत आहेत.सदर कारवाई अकोला एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रींकात धीवरे, उपअधीक्षक शरद नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इश्वर चव्हाण, पो.ना. अरुण इंगोले, पोकॉ सुनील येलोणे, चा.पो.ना.सलीम खान यांनी केली.
प्रत्येक फेरीसाठी मागत होते ५० रुपये
बुलडाणा ते मलकापूर या रस्त्यावर वाहतुक पोलिसांनी काही दिवसांपासून वसुली सुरू केली होती. एका फेरीसाठी प्रती वाहन ५० रुपयांची मागणी हे पोलिस वाहन चालकांना करीत होते. तसेच पुढे कारवाई होणार नाही याची हमीही देत होते. गत काही दिवसांपासून सुरू असलेली ही वसुली एसीबीच्या कारवाईमुळे थांबली आहे.