निवृत्तीला आलेल्या शिक्षकाकडून तीन विद्यार्थिनींवर अत्याचार; किनगाव राजा ठाण्यात गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Published: August 23, 2024 10:22 PM2024-08-23T22:22:40+5:302024-08-23T22:22:55+5:30
शिक्षकाला अटक करण्यात आली असून, प्रशासनाने त्यास तत्काळ सेवेतून निलंबित केले आहे़ खुशाल शेषराव उगले असे या शिक्षकाचे नाव आहे़.
सिंदखेड राजा/ किनगाव राजा : निवृत्तीला आलेल्या शिक्षकाने आपल्याच शाळेतील तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २३ ऑगस्ट राेजी उघडकीस आली़ याप्रकरणी किनगाव राजा पाेलिस ठाण्यात आराेपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. शिक्षकाला अटक करण्यात आली असून, प्रशासनाने त्यास तत्काळ सेवेतून निलंबित केले आहे़ खुशाल शेषराव उगले असे या शिक्षकाचे नाव आहे़.
आपल्याच शाळेतील अल्पवयीन मुलींना उशिरापर्यंत थांबवून संबंधित शिक्षक अत्यंत घृणास्पद कृत्य करीत होता. न कळत्या वयात मुलींना धाक दाखवून, कधी आमिष देऊन त्याचे हे अश्लील चाळे सुरू होते. यावेळी मात्र मुलींनी घरी सांगितल्याचे बोलले जाते. त्यावरून संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकास ताब्यात घेतले़ ६ सप्टेंबर १९९३ पासून उगले यांची शिक्षकी सेवा सुरू झाली़ सेवानिवृत्ती जवळ आलेली, नातवंडे खेळविण्याच्या वयात संबंधित शिक्षकाने केलेले हे कृत्य पहिल्यांदाच केले नसून अडीच महिन्यांपूर्वी त्याने असाच प्रकार आपल्या शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत केल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र, त्यावेळी हा प्रकार दाबण्यात आल्याने संबंधित शिक्षकाचे धाडस वाढले. पुन्हा एकदा काळे कृत्य करून शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे.
प्रशासनाने केले तत्काळ निलंबीत
संबंधित शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद कायद्यांतर्गत व वरिष्ठांच्या सूचनेनुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ़ श्रीकृष्ण वेनीकर यांनी खुशाल उगले यांचे निलंबन केले आहे. शाळा मुख्याध्यापकांचा अहवाल, शिक्षकी पेशाला मलिन करणारी कृती, अशोभनीय कृत्य झाल्याचे लक्षात आल्याने संबंधित शिक्षकाचे तत्काळ निलंबन करण्यात आल्याचे वेनीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोस्को अंतर्गत गुन्हा दखल
संबंधित संशयित आरोपीविरुद्ध लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेस) पोस्को अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे़ त्याचबरोबर अत्याचाराच्या कलमान्वये, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम करत आहेत.