खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले, 32 गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 03:19 PM2022-08-05T15:19:37+5:302022-08-05T15:20:15+5:30
तीन जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा: जिल्हयातील मोठ्या तीन धरणापैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे ०.१० मिटरने उघडण्यात आले असून प्रकल्पातून १०९२.०१ क्युसेक्स अर्थात ३०.९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे बुलडाणा, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्ककतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रकल्पाच्या १९ दरवाजांपैकी १, १० आणि १९ क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
खडकपूर्णा धरणाची पाणीसाठवण क्षमता १६०.६६ दलघमी असून मृतसाठा पातळी ६० दलघमी आहे. २०१३ मध्ये प्रथमच या प्रकल्पात पाण्याचा संचय करण्यात आला होता. सध्या प्रकल्पामध्ये ८४.४५ टक्के जीवंत जलसाठा आहे. ५ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान धरणात पाण्याची आवक वाढल्यास पाण्यातून आणखी विसर्ग होऊ शकतो. धरण सुरक्षा विभागाच्या निकषानुसार ऑगस्टमध्ये प्रकल्पात करावायाच्या जलसाठ्याव्यतिरिक्त असलेले पाणी हे नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
या गावांना सतर्कतेचा इशारा
खडकपूर्णा प्रकल्प अर्थात संत चोखा सागरातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने बुलडाणा जिल्ह्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रूक, डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, निमगाव वायाळ, हिवरखेडसह लगतच्या जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.