तीन लाखांचे शेती साहित्य जळून खाक
By Admin | Published: March 4, 2017 12:52 AM2017-03-04T00:52:46+5:302017-03-04T00:52:46+5:30
शेतात लागलेल्या आगीत शेतीपयोगी साहित्य जळाले.
संग्रामपूर(जि. बुलडाणा), दि. ३- तालुक्यातील कोद्री येथील एका शेतकर्याच्या शेतात ठेवलेल्या स्प्रिंकलर पाइप, ठिबक नळ्यांच्या बंडलांना व इतर शेतीपयोगी साहित्याला २ मार्चच्या मध्यरात्री अचानकपणे आग लागून साहित्य खाक झाले. यामध्ये शेतकर्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ३ मार्च रोजी उघडकीस आली.
कोद्री येथील शेतकरी बळीराम आनंदा खोंड यांचे कोद्री शिवारात सर्व्हे नं.गट नं. १४१ मध्ये शेत आहे. याच शेतामध्ये विहीर असून, या विहिरीव्दारे ते बागायती शेती करतात. त्यामुळे त्यांनी बागायती शेती करण्याकरिता स्प्रिंकलर सेट २, १२ नोझल ठिबकच्या नळ्याचे २0 बंडल, पाइप २५ नग तसेच जनावरांसाठी कुटार दोन ट्रॉली असे शेतामध्ये ठेवले होते. दरम्यान त्यांच्या शेतात ठेवलेल्या या शेतीपयोगी साहित्याला व कुटाराला २ मार्चच्या मध्यरात्री अचानकपणे आग लागली. रात्रीच्या वेळीला अचानकपणे आग लागल्यामुळे शेतकर्याला काहीच करता आले नाही. दरम्यान, नेहमीप्रमाणे शेतकरी खोंड हे ३ मार्च रोजी दुपारी १२ वा. शेतात गेले असता त्यांना शेतात ठेवलेले साहित्य खाक झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती शेतकरी खोंड यांनी तहसीलदार व पोलीस स्टेशन तामगाव यांना दिली असून, तहसीलदारांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.