धनादेश अनादर प्रकरणी एकास तीन महिने शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:34 PM2018-10-06T14:34:56+5:302018-10-06T14:35:08+5:30
बुलडाणा: धनादेश अनादरप्रकरणी बुलडाणा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील वसंतनगर येथील दीपा सुका जाधव यांना तीन महिने कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
बुलडाणा: धनादेश अनादरप्रकरणी बुलडाणा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील वसंतनगर येथील दीपा सुका जाधव यांना तीन महिने कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दीपा सुका जाधव यांनी बुलडाणा अर्बन को. आॅ क्रेडीट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेतून एक लाख ६० हजार रुयांचे पीक कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचा त्यांनी नियमित स्वरुपात भरणा केला नाही. संस्थेचे कर्ज अधीक्षक प्रशांत कुळकर्णी यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी थकीत कर्जाची मागणी केली होती. त्या बदल्यात दीपा जाधव यांनी कर्ज अधीक्षक यांना ५० हजार रुपयांचा धनादेश तीन सप्टेंबर २००९ रोजी दिला होता. मात्र हा धनादेश अनादरीत झाला. त्यामुळे कर्ज अधीक्षक यांनी प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात संस्थेचे विधीतज्ञ भैरव पांडे यांच्या मार्फत दीपा जाधव यांच्या विरोधात प्रकरण दाखल केले होते. प्रकरणात उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व न्यायनिवाड्याचे अवलोकन करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक १च्या श्रीमती एस. एम. पाडोळीकर यांनी २५ सप्टेंबर रोजी दीपा जाधव यांना तीन महिने साधा कारावास व ७५ हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली. वादी पक्षातर्फे अॅड. भैरव पांडे यांनी काम पाहले.