बुलढाणा जिल्ह्यातील तीन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 04:28 PM2018-11-09T16:28:26+5:302018-11-09T16:28:50+5:30
सिंदखेडराजा: राष्ट्रीय पातळीवर झालेल्या शुटींग बॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तीन खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या स्पर्धेसाठी निवड ...
सिंदखेडराजा: राष्ट्रीय पातळीवर झालेल्या शुटींग बॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तीन खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये चिखली तालुक्यातील अमडापूर येथील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर अखेर म्यानमारमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेमध्ये हे खेळाडू सहभागी होतील. पंजाब राज्यात झालेल्या खुल्या गटातील स्पर्धेत लहू बोडखे, कल्याणी माळोदे, ज्योती सपकाळ या खेळाडूंची चमकदार कामगिरी केल्यामुळे भारताच्या संघात त्यांना प्रतिनिधीत्व मिळाले असून आंतराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा बहुमान या तीन ही खेळाडूंना आता मिळणार आहे. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धा झाल्या होत्या. दरम्यान, गेल्या चार दशकापासून सवडद- साखरखेर्डा येथील स्वामी विवेकानंद शुटींग बॉल संघ आणि दरेगाव येथील संघाने विविध स्पर्धामध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. दरवर्षी येथील संघ हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत आहेत. मधूकर गाडगे आणि आत्माराम गाडे यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे. विदर्भ शुटींग बॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके, सचीव शकीलकाझी, सुनील पवार, शरद खासभागे यांनी खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड करताना त्यांची चाणाक्ष बुध्दीमत्ता आणि कल्पकता ओळखून खेळाडूंना स्पर्धेत खेलवले. त्यामुळे लहू बोडखे, कल्याणी माळोदे, ज्योती सपकाळ या खेळाडूंची आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कल्याणी माळोदे आणि ज्योती सपकाळ या अमडापूर येथील अमर विद्यालयाच्या विद्यार्थी नी आहेत. त्यांच्या या निवडी बद्दल पाटीलबुवा बंगाळे, अविदास बंगाळे, आश्रूबा बंगाळे, विठोबा मांटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. (तालुका प्रतिनिधी)