तीन शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्राला झळाळी !
By निलेश जोशी | Published: July 15, 2023 08:19 PM2023-07-15T20:19:01+5:302023-07-15T20:19:15+5:30
५३ वर्षांत १२ जणांना मिळाला पुरस्कार : जागतिक तिरंदाजीत बुलढाण्याचे वर्चस्व
बुलढाणा : अमॅच्युअर हरवलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला दोन खेळाडू व एका प्रशिक्षकाला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्यामुळे एक नवी झळाळी मिळाली आहे. १० वर्षांनंतर बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे १९९० पूर्वीप्रमाणे पुन्हा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस येऊ शकतात.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या या क्रीडा पुरस्कारामध्ये भारतीय तिरंदाजी संघाचे २०१९ पासून प्रशिक्षक असलेले चंद्रकांत इलग यांना २०२१-२२ चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तर तिरंदाजीचीच खेळाडू मोनाली जाधवला आणि दिव्यांग खेळाडू अनुराधा सोळंकी हिला व्हीलचेअर तलवारबाजीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडाजगताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी ही नोंद व्हावी. शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या आजपर्यंतच्या ५३ वर्षांच्या इतिहासात बुलढाणा जिल्ह्यातील १२ जणांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खेळाडू तसेच संघटक म्हणून मिळालेला आहे. त्यावरून बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राची व्याप्ती स्पष्ट होते.
-चंद्रकांत इलग-
चंद्रकांत इलग हे सध्या भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक आहेत. सैन्यातून २०१२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्याच वर्षी त्यांनी धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण बुलढाण्यात नि:शुल्क सुरू केले. त्यानंतर ते पोलिस दलात सहभागी झाले. त्यांच्या मेहनतीमुळे देशात आज महाराष्ट्र पोलिस दलाचे धनुर्विद्येत नाव झाले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात प्रथमेश जावकार जागतिक क्रमवारीत अव्वल आहे. मोनाली जाधवने चीनमधील आंतरराष्ट्रीय पोलिस गेममध्ये भारताचा डंका वाजवला होता. मिहीर अपारनेही यूथ वर्ल्ड कप गाजवला; तर आता मानव जाधवनेही आयर्लंडमध्ये जिल्ह्याच्या लौकिकात नुकतीच भर टाकली.
-मोनाली जाधव-
मोनाली जाधव ही सध्या पोलिस दलात आहे. २०१९ मध्ये तिने चीनमधील चेंगडू येथे भारतासाठी दोन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले आहे. एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून तिने लौकिक मिळविला आहे. सामान्य घरातून आलेल्या मोनालीने आपल्या कष्टाच्या जोरावर ही किमया साधली आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्यासोबतच तिला हा पुरस्कार खेळाडू म्हणून जाहीर झाला आहे.
अनुराधा सोळंकी
अनुराधा सोळंकींना दिव्यांग खेळाडू म्हणून व्हीलचेअर तलवारबाजीमध्ये शिवछत्रपती क्रीडापुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक पातळीवर सध्या ३८व्या स्थानावर अनुराधा सोळंकी आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी आतापर्यंत सात पदके मिळविली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्या कार्यरत आहेत.
१९८२-८३ मध्ये मिळाला होता पहिला पुरस्कार
बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात संघटक म्हणून पहिला शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार मलकापूरचे स्व. संभाजीराव जगदाळे यांना १९८२-८३ मध्ये मिळाला होता. त्यानंतर मलकापूरचे छत्रपती दंड (१९९५-९६), टी. ए. सोर (१९९६-९७), विपप्रताप नवनीत थानवी (१९९८-९९) यांना क्रीडा संघटक म्हणून पुरस्कार मिळाला होता. दरम्यान नांदुरा येथील राम कोलते ( २०००-०१), अमडापूर येथील सुषमा कांबळे, अरुणा देशमुख (२००४-०५) यांना शुटींग बॉल खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर खामगाव येथील सीताराम तायडे (२००८-०९) आणि शेषनारायण लोढे (२०१३-१४) मध्ये क्रीडा संघटक म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
इलग जर्मनीसाठी रवाना
भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक असलेले चंद्रकांत इलग हे १५ जुलै रोजी जर्मनीतील बर्लिन येथे होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. २७ जुलै पासून तेथे ही स्पर्धा सुरू होत आहे.