परीक्षेच्या तणावातून दहावीच्या तीन विद्यार्थीनींनी खाल्ले उंदीर मारण्याचे औषध; दोघींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 07:02 PM2019-02-24T19:02:29+5:302019-02-24T20:44:54+5:30
दहावीच्या परिक्षेच्या तणावातून खामगाव शहरातील तीन विद्यार्थिनींनी शुक्रवारी दुपारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ले. विषबाधा झाल्याने त्यापैकी दोघींचा उपचारादरम्यान अकोला सर्वाेपचार रुग्णालयात २४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला
खामगाव: दहावीच्या परीक्षेच्या तणावातून खामगाव शहरातील तीन विद्यार्थिनींनी शुक्रवारी दुपारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ले. विषबाधा झाल्याने त्यापैकी दोघींचा उपचारादरम्यान अकोला सर्वाेपचार रुग्णालयात २४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. तर तिसऱ्या विद्यार्थीनीवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नयना सदाशिव शिंदे रा.चिंतामणी नगर खामगाव, निकिता अनिल रोहणकार रा.किसन नगर व रुपाली किशोर उनवणे ह्या तिघी नॅशनल शाळेत दहावीला आहेत. येत्या १ मार्चपासून दहावीची परिक्षा सुरू होणार आहे. दरम्यान तिनही विद्यार्थिनींची २२ फेब्रुवारी प्रॅक्टिकलची परिक्षा होती. प्रॅक्टिकल झाल्यानंतर विद्यार्थीनी शाळेच्या बाहेर आल्या. प्रॅक्टीकल चांगले न गेल्याने व समोर परिक्षा असल्याने आलेल्या तणावातून दुपारी सुमारे ३ वाजता तिघींनीही नॅशनल शाळेसमोरच उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. त्यामुळे त्यांना उलट्या व मळमळ सुरू झाली. यातील नयना शिंदे या विद्यार्थिनीला २२ फेब्रुवारी रोजी अकोला येथे सर्वोपचार रूग्णालयात भरती करण्यात आले.
निकिता रोहणकार या विद्यार्थीनीवर सुरूवातीला खामगावातील खासगी रूग्णालयात उपचार करून नंतर अकोला येथे सर्वोपचार रूग्णालयात भरती करण्यात आले. या दोघींचाही २४ फेब्रुवारी रोजी अकोला येथे मृत्यू झाला. रूपाली उनवणे या विद्यार्थिनीवरही सुरूवातीला खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर सध्या तिला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. येथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
पाणीपुरीमुळे मृत्यू झाल्याची होती चर्चा
दरम्यान पाणीपुरी खाल्याने विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी चर्चा शहरात सुरु होती, परंतु सध्या खामगाव येथे उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनीने पोलीसांना दिलेल्या बयाणावरून तिघींनीही उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याचे समोर आले आहे.