पैशाची बॅग हिसकणा-यास तीन वर्षे सश्रम कारावास
By Admin | Published: January 22, 2016 01:38 AM2016-01-22T01:38:53+5:302016-01-22T01:38:53+5:30
व्यापा-यास केले होते जखमी.
जळगाव जामोद(जि. बुलडाणा): आपले कामकाज आटोपून संध्याकाळी पैशाची बॅग काखेत लटकवून घरी जात असलेल्या जळगावातील व्यापारी मंगलदास मोदी यांना जखमी करून त्यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून पळ काढणार्या आरोपी शेख आबीद शे.कुरेशी रा. नांदुरा याला गुरुवार, २१ जानेवारी रोजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अ.ज.फटाले यांनी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना १६ फेब्रुवारी २0१५ रोजी स्थानिक दुर्गा चौकात घडली होती. त्यावेळी व्यापारीवर्गात कमालीची दहशत पसरली होती. आरडाओरड होताच पोलीस उप-निरीक्षक संदीप मुपडे व त्यांच्या दोन सहकार्यांनी पोकॉं गणेश पाटील, रामधन गवळी यांनी आरोपीस तत्काळ पकडून भादंविच्या कलम ३९२, ३९४ अन्वये गुन्हा दाखल करून या घटनेतील आरोपी शेख आबीद व दुसरा आरोपी शेख जाकीर रा. जळगाव जा. यांना अटक केली होती. यामधील शेख आबीद यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली तर दुसरा आरोपी शे.जाकीर याची निर्दोष सुटका झाली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील एम.एस.खरात यांनी काम पाहिले.