बुलडाणा जिल्हय़ात साहित्यरसिकांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 03:08 AM2017-09-11T03:08:57+5:302017-09-11T03:09:31+5:30
बुलडाणा-हिवराआश्रम : देशाची राजधानी दिल्लीविरुद्ध ग्रामपंचायत स्तरावरील संस्थेच्या चढाओढीत रसिकाश्रयांचा विजय झाला. विवेकानंद आश्रमाने दाखविलेले धाडस व घेतलेल्या मेहनतीचा हा विजय असून, हिवराआश्रम येथे ९१ अ.भा. मराठी साहित्य संमेलन भव्य- दिव्य पार पाडण्याचा निर्धार जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय साहित्य संमेलन हिवराआश्रम येथे आयोजित करण्याचे निमंत्रण विवेकानंद आश्रमाच्यावतीने पाठविण्यात आले होते. महामंडळाकडे आलेल्या सहा निमंत्रणापैकी तीन निमंत्रण स्वीकारत स्थळ पाहणी करण्यात आली. यामध्ये दिल्ली, बडोदा व हिवराआश्रमचा समावेश आहे. या स्थळाची पाहणी संपल्यानंतर रविवारी नागपूर येथे पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत यंदाचे साहित्य संमेलन हे हिवराआश्रम येथे होणार, यावर महामंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. हिवराआश्रमला साहित्य संमेलन मिळाल्याने रसिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राजमाता जिजाऊ, संत चोखामेळा, कविवर्य ना.घ. देशपांडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व हिवराआश्रमची खरी ओळख असलेले शुकदास महाराज, अशी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. शिवाय, आतापर्यंत एकूण नव्वद संमेलने झालीत; परंतु संमेलनाच्या यजमान पदाचा मान या जिल्ह्याला मिळालेला नाही. हिवराआश्रम एक ग्रामपंचायत स्तरावरील वसलेले गाव असून, येथील विवेकानंद आश्रम ही संस्था संमेलनाची आयोजक आहे. विवेकानंद जन्मोत्सवाचा भक्कम नियोजनाचा प्रदीर्घ अनुभव या संस्थेच्या पाठीशी आहे.