जलसंधारणाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती - कुरूंदकर
By admin | Published: March 5, 2015 11:40 PM2015-03-05T23:40:29+5:302015-03-05T23:40:29+5:30
बुलडाणा जिल्हा आराखड्यात ६१.७१ कोटीची भरीव वाढ.
बुलडाणा : जिल्हा वार्षिक योजनेचा २0१४-१५ चा जिल्ह्याचा आराखडा यापूर्र्वी १६१ कोटी रुपयांचा होता. त्यामध्ये पालकमंत्नी एकनाथराव खडसे व जिल्हा प्रशासन यांच्या प्रयत्नाने तब्बल ६१.७१ कोटी रुपयांची एवढी भरीव वाढ करण्यात आली असून, आराखडा २२२.७१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती झाली असून, त्याचे फलित म्हणून वाढीव निधीमध्ये ४१.७१ कोटी रुपये जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी ५ मार्च रोजी आयोजित पत्नकार परिषदेमध्ये दिली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी नेताम सेडाम व उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे उपस्थित होते. मुंबईत मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात येणार्या कामांचे सादरीकरण जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी केले होते. या कामांचे महत्त्व व जिल्ह्याची गरज लक्षात घेता आराखड्यात घसघसीत ६१.७१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ३३0 गावांची जलयुक्त शिवार अभियानात निवड करण्यात आल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले की, या ३३0 गावांमध्ये टँकरग्रस्त असणार्या ८0 गावांचा समावेश करण्यात आला आहे. समाविष्ट गावांचे पाणी ताळेबंद तयार करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारणांच्या कामांमुळे जिल्ह्यातील २७५ टँकरची असलेली मागणी ८ ते १0 पर्यंत आली आहे. गत काही दिवसांमध्ये जिल्ह्यात ४५0 च्या वर बंधारे बांधण्यात आली आहेत. खामगाव तालुक्यातील निरोड-घारोड भागामध्ये साखळी बंधारे घेतल्यामुळे तेथील भूजल पातळी वाढली असून, तेथील शेतकरी बागायती पिके घेत आहेत. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील धा. बढे, सिंदखेड लपाली या भागामध्येही शेतकरी केळीसारखे बागायती फळ पीक घ्यायला लागला आहे. हा क्रांतिकारी बदल जिल्ह्यामध्ये घडत असल्याचे त्यांनी सांगितले.