तिकीट चेकर वाघ, सनगाळे निलंबित
By Admin | Published: January 21, 2017 02:31 AM2017-01-21T02:31:57+5:302017-01-21T02:31:57+5:30
दिव्यांग व्यक्तीस अपमानास्पद वागणूक देणे भोवले.
बुलडाणा, दि. २0- शंभर टक्के दिव्यांग असताना एसटी बसचे पूर्ण तिकीट आकारून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी महामंडळाचे अधिकारी भास्कर वाघ व प्रमोद सनगाळे यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. आ.बच्चू कडू यांनी दिव्यांगाच्या उपोषणाची दखल घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स.दानिश स.आमिन यांनी उपोषण सुरू केले होते. तिसरा दिवस उजाडल्यानंतरही एकाही अधिकार्याने दानिश यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने येथील कार्यकर्त्यांनी आ.बच्चू कडू यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर दिव्यांगाच्या या प्रश्नाबाबत आ. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अधिकारी अनिल मेहतर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि दोषींवर कारवाईची मागणी रेटून धरली. त्यामुळे तिकीट चेकर भास्कर वाघ व प्रमोद सनगाळे यांना पत्र क्र.अप./३0९२ नुसार आज २0 जानेवारी रोजी निलंबित केले. या कारवाईचे पत्र देऊन स.दानिश स.आमिन यांचे उपोषण सोडविण्यात आले.
यावेळी विभागीय वाहतुक अधिकारी एस.टी. पाटील, विभागीय कामगार अधिकारी डी.बी.राठोड यांच्यासह नामदेव डोंगरदिवे, गणेश सोनुने, अँड.शरद राखोडे, मोईन काझी, चंद्रकांत बर्दे, संजय जाधव, संजय काळे, अक्रम चौधरी, सुनीता जाधव आदी उपस्थित होते.