एसटी बसमध्ये पुन्हा तिकिटांची टकटक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:21 PM2020-12-21T12:21:56+5:302020-12-21T12:57:10+5:30
ST Bus News ९० टक्के ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त झाल्या आहेत.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : एसटी महामंडळाच्या वाहकांना बसेसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी उपलब्ध केलेल्या ९० टक्के ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेसमध्ये तिकिटासाठीची टकटक सुरू झाली आहे. त्यातच मशीनची सवय झालेल्या वाहकांनाही त्याचा त्रास होत आहे. तर स्मार्ट कार्ड सवलतीतही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसोबत करार करून वाहकांना ‘’ईटीआयएम’’ (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) उपलब्ध करून दिल्या;
परंतु कालांतराने या मशीनचे आयुष्यमान झाल्यामुळे या मशीन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले.
त्यातच मार्चअखेर लागलेल्या लाॅकडाऊनमध्ये मशीनचा वापर थांबला. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती झाली नाही. परिणामी, महामंडळाच्या सर्वच आगारात असलेल्या एकूण मशीनपैकी ९० टक्के बंद पडल्या आहेत. मशीन नादुरुस्त झाल्यास आगारात त्या दुरुस्त करण्यासाठी ट्रायमॅक्स कंपनीने कुठलीही व्यवस्था केलेली नाही. दुरुस्तीसाठी जिल्हास्तरावर द्याव्या लागतात; मात्र तेथेही दुरुस्ती होत नसल्याची माहिती आहे.
मशीनचे आयुर्मान संपुष्टात
‘’ईटीआयएम’’ मशीन उपलब्ध करून दिल्या; परंतु कालांतराने या मशीनचे आयुष्यमान झाल्यामुळे या मशीनमध्ये दोष निर्माण होत आहेत.
एसटी महामंडळाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या मध्यवर्ती संयुक्त विचारविनिमय बैठकीत उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी ईटीआयएम मशीन विषयावर या मशीनचे आयुष्यमान जास्त झाल्याचे मान्य केले.
दोष वाहकांच्या माथी
मशीन नादुरुस्त होण्यास वाहक जबाबदार नाही; परंतु या मशीनचे स्पेअर पार्ट, बॅटरी गहाळ झाल्यास त्यास वाहक दोषी राहणार असल्याचे सांगण्यात आले. तरीसुद्धा एसटी महामंडळात ईटीआयएम मशीन नादुरुस्त झाल्यास त्याचे खापर वाहकांच्या माथी फोडून त्यांच्याकडून त्याबाबत वसुली करण्याचा प्रकार काही ठिकाणी सुरू झाला आहे.
तिकीट मशीन दुरुस्तीसाठी बुलडाणा येथे पाठविल्या जातात. त्यांच्याकडून दुरुस्ती झाल्यानंतर त्या वापरात येतील.
- आर.यू. पवार,
स्थानक प्रमुख, खामगाव.