ग्रामीण भागात तिफनकरी झाले दुर्मीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:04+5:302021-06-17T04:24:04+5:30
अशाेक इंगळे साखरखेर्डा : बैलांची संख्या कमी झाल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. सिंदखेडराजा तालुक्यात ६४ हजार ...
अशाेक इंगळे
साखरखेर्डा : बैलांची संख्या कमी झाल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. सिंदखेडराजा तालुक्यात ६४ हजार ३०० हेक्टरवर खरिपाची पेरणी हाेत आहे. साखरखेर्डा परिसरात कपाशीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते एकमेकांची सांगड घालण्यासाठी धावपळ करीत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यात रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या पावसाने शेतकऱ्यांना पेरणीकरिता सावधान केले. सात मंडलांपैकी काही मंडळात दमदार पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीसाठी सरसावला आहे. काही भागात दमदार पाऊस झाला नसला तरी पेरणीयोग्य पाऊस पडत असल्याने शेतकरी पेरणीसाठी लगबग करीत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मृग नक्षत्राच्या पावसावर नजर ठेवून असतो. त्याकरिता पेरणीयोग्य बियाणे, रासायनिक खते याची जुळवाजुळव करून पेरणीला सुरुवात करतो. यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी शेतात फुली काढून कपाशीची लागवड केली. आज कपाशीची लागवड अंतिम टप्प्यात असून, तालुक्यात कपाशीची लागवड २२ हजार १३० हेक्टरवर होत आहे. कपाशीनंतर शेतकरी मूग आणि उडीदाची पेरणी करतो. मूग पेरणीसाठी बैलांची सांगड घालून पेरणी करताना शेतकरी दिसत आहे. पेरणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. स्वत:च तिफनकरी होऊन पेरणी करावी लागत आहे. मुगाचा पेरा ६०० हेक्टरवर, तर उडीदाचा पेरा ५०० हेक्टरवर सुरू आहे.
साेयाबीनचा पेरा वाढणार
यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार असून, ३३ हजार १०० हेक्टरवर पेरणी हाेण्याचा अंदाज आहे. सोयाबीन पेरणीसाठी बैलजोडीची सांगड घालणे कठीण असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवरील पेरणी यंत्राचा वापर करावा लागत आहे. तालुक्यात ४० हजार शेतकरी असून, १० हजार शेतकऱ्यांजवळ गोधन सापडणे कठीण झाले आहे.
बैलांची संख्या घटली
गोधनाच्या कमतरतेमुळे बैलही शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाही. बैल सांभाळणे, गोठा स्वच्छ ठेवणे आजच्या पिढीला कंटाळवाणा विषय वाटतो. त्यामुळे गोधन दुर्मीळ झाले आहे. शेतकऱ्यांना यंत्रावरच पेरणी करावी लागत आहे.
कपाशीची लागवड करताना फुली काढूनच टोचणी करावी लागते. यासाठी मजुरांची प्रतीक्षा न करता घरचीच मंडळी टोचणी करतात.
प्रल्हाद खरात, प्रगतशिल
कास्तकार सोयाबीन पेरणीसाठी बैलजोडी मिळणे कठीण असल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवरील पेरणी यंत्राचा वापर केला आहे.
शिवाजी काटे, शेतकरी, पांग्री काटे