Tiger in Khamgaon: खामगावात वाघाची दहशत, वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 09:07 PM2021-12-04T21:07:20+5:302021-12-04T21:07:33+5:30
खामगाव शहरातील केशवनगर भागातील स्मशानभूमी परिसरात झाडेझुडपे आहेत. या परिसरातील राजपूत यांच्या घरामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये घरासमोरून रस्त्यावर वाघ चालत गेल्याचे दृश्य कैद झाले.
खामगाव : शहरातील मध्यभागी भरवस्तीत शनिवारी पहाटे अनेकांना वाघाचे दर्शन झाले, त्यामुळे दिवसभर नागरिकांमध्ये दहशत होती. वनविभागाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. शनिवारची रात्र खामगावकरांसाठी भीतीदायक ठरली. कुणीही घराबाहेर न निघण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांनी केले आहे.
खामगाव शहरातील केशवनगर भागातील स्मशानभूमी परिसरात झाडेझुडपे आहेत. या परिसरातील राजपूत यांच्या घरामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये घरासमोरून रस्त्यावर वाघ चालत गेल्याचे दृश्य कैद झाले. याचवेळी याच भागातील महिलेनेही वाघ बघितला. ही वार्ता शनिवारी सकाळी शहरात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, तो वाघ आहे की बिबट्या हे स्पष्ट होऊ शकले नाही. शहरात दिवसभर वाघाची चर्चा असतानाच पाच वाजण्याच्या दरम्यान केशवनगर भागात असलेल्या झुडपांमध्ये वाघ असल्याची माहिती काही नागरिकांनी वनविभागाला दिली. या भागात वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहोचले. तसेच या ठिकाणी बघ्यांचीही गर्दी झाली. पोलिसांनी रस्ता बंद करून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. पाच वाजतापासून ते रात्री १० वाजेपर्यंत या ठिकाणी वनविभाग, पोलीस व महसूलचे अधिकारी उपस्थित होते. वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील भरवस्तीत वाघ आला कसा? याचाही शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
वाघ की बिबट्या?
शहरातील अनेक नागरिकांनी वाघाला पाहिले असल्याचे सांगितले. वनविभागालाही त्यांनी तशी माहिती दिली. मात्र, तो वाघ आहे की बिबट्या आहे, हे वनविभाग निश्चित करू शकला नाही.
हाच सी वन वाघ?
ज्ञानगंगा अभयारण्यात काही दिवसांपूर्वी सी वन वाघ होता. त्या वाघाला कॉलर आयडी होता. मात्र, गत काही दिवसांपासून तो सी वन वाघ बेपत्ता झाला. त्याचा पत्ता लागत नाही. तो वाघ खामगावातील असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना इशारा
खामगाव शहरातील मढी, सुटाळपुरा, सिंधी कॉलनी, सिव्हिल लाईन, महाकाल चौक, डीपी रोड, फरशी, लायन्स ज्ञानपीठापर्यंत रहिवासी नागरिकांनी मॉर्निंग वॉक करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.