मेंहदी लावायच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:46+5:302021-05-06T04:36:46+5:30
या वर्षी उन्हाळ्यात लग्नसराईत अनेकांनी लग्नाच्या तारखा काढून त्या दृष्टीने लगीनघाई सुरू केली होती. मात्र, ऐन मार्च महिन्यात कोरोनाचे ...
या वर्षी उन्हाळ्यात लग्नसराईत अनेकांनी लग्नाच्या तारखा काढून त्या दृष्टीने लगीनघाई सुरू केली होती. मात्र, ऐन मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहून सर्वांनीच धास्ती घेतली. आपल्या मुलांचे लग्न अशा कठीण काळात कसे लावायचे, याची चिंता वधू-वर पित्यांना पडली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत विवाह मुहूर्त जास्त असतात. अगोदरच सहा महिन्यापासून वधू-वर पित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय व मंडप डेकोरेशन बुक केले होते. लग्नसराईची लगबग व धावपळही सुरू होती, परंतु मार्च अखेर व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना संसर्गाबाबत जनजागृती वाढली व कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाऊनचा वाढता कालावधी वधू-वर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने निघत असल्याने व अनेकांचा मृत्यूही होत असल्याने विवाह सोहळे मोजक्याच उपस्थित लावण्याचे निर्बंध लादण्यात आले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणाही विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने, वधू-वर पित्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
लग्नाची घाई करू नका, पुढेही आहेत लग्नाचे मुहूर्त
आपल्या लाडक्या मुला-मुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे, म्हणून अनेक वधू-वर पिता लपून छपून विवाह आयोजित करीत आहेत. पुढील काही महिन्यात मुहूर्त नाहीत, असा चुकीचा समज करून विवाह समारंभ आयोजित केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. लग्नाची घाई करू नका, पुढेही आहेत लग्नाचे मुहूर्त असे म्हणण्याची वेळ आली आहे.