व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:41+5:302021-05-03T04:28:41+5:30
यावर्षी आजाराचे कमी प्रमाण झाल्यामुळे नव्याने कर्ज काढून उत्साहाने व्यवसाय करण्याकरिता व्यवसायिक सज्ज झाले होते़ परंतु, जानेवारीपासून दुसरी ...
यावर्षी आजाराचे कमी प्रमाण झाल्यामुळे नव्याने कर्ज काढून उत्साहाने व्यवसाय करण्याकरिता व्यवसायिक सज्ज झाले होते़ परंतु, जानेवारीपासून दुसरी लाट आल्याने पुन्हा सर्व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली़ लग्न समारंभाकरिता पंचवीस नागरिकांचे उपस्थिती व वेळेचे बंधन घातल्याने पुन्हा व्यवसाय ठप्प झाला आहे़ त्यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी या व्यावसायिकांकडून जोर धरत आहे़
दरवर्षी हिंदू धर्म संस्कृतीच्या परंपरेनुसार तुळशी विवाह झाला की, लग्नसराईला सुरुवात होते़ गतवर्षीचा अनुभव पाहता कोरोना संसर्ग आजार नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कमी असल्याने यावर्षी सर्व समाजातील वर- वधू यांची सोयरीक जुळून कुंकू टिळा उरकून लग्नाचे मुहूर्त ठरवून ठेवण्यात आले होते़ यामध्ये मार्च एप्रिल मे महिन्यात लग्नाची धूम असते तर काही गावांमध्ये एका तिथीवर लग्न केले जातात़ त्यामुळे पूर्वतयारी म्हणून काही पालकांनी अगोदरच मंगल कार्यालय लग्नपत्रिका ,घोडा, आचारी, फोटोग्राफर, बँड बाजा यांना तारीख घेऊन इस्सारसुद्धा देऊन ठेवला होता़ मात्र, जानेवारी महिन्यापासून पुन्हा दुसरी लाट आल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोना आजार झपाट्याने वाढत असल्याने शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा सोडून नाका-बंदी संचारबंदी असे आदेश दिले़ कामाशिवाय घरा बाहेर पडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सर्व सामाजिक धार्मिक सांस्कृतिक सोहळे स्थगित करण्यात आले आहे़ लग्न पंचवीस नागरिकांचे उपस्थित व वेळेच्या आत विवाह सोहळे उरकले जात असल्याने विवाह निगडित व्यवसाय थांबले आहेत़ त्यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़