कडक निर्बंधामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:22+5:302021-05-07T04:36:22+5:30
मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. त्यावेळी शासनाने स्वस्त धान्य दुकानातून शेतकरी योजनेतील कार्ड वगळता एका व्यक्तीमागे ...
मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. त्यावेळी शासनाने स्वस्त धान्य दुकानातून शेतकरी योजनेतील कार्ड वगळता एका व्यक्तीमागे पाच किलो धान्य मोफत दिले होते. तसेच तीन महिन्यांत उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस धारकांना गॅस मोफत दिले होते. त्यावेळी काही दानशूर लोकांनी भावनिक होऊन पुढाकार घेत काही गोरगरीब व गरजू लोकांना अन्नधान्याची तथा किराणा सामानाची कीट तयार करून ती वितरित केली होती. त्यामुळे काही प्रमाणात गोरगरीब लोकांना तो एक आधार झाला होता. त्यासोबतच आसपासचे शेजारीही एकमेकांची आस्थेने चौकशी करीत होते. एकमेकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून एकमेकांना सहकार्य करीत होते. रुग्णसंख्या कमी होत गेल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आणि काही काळासाठी सर्व दुकाने उघडण्यात आली. परंतु, कोरोनाचा प्रकोप कमी होताच पुन्हा शिथिलतेत वाढ करण्यात आली. त्यातच पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. कोरोनाची दुसरी लाट आली. पुन्हा ब्रेक दि चैन अंतर्गत लॉकडाऊनची वेळ वाढविण्यात आली. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून त्यामुळे कडक निर्बंध लावून लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. सर्वत्र बांधकाम साहित्याची दुकाने, सलूनची दुकाने पान मसाल्याची दुकाने यासारखे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. बांधकाम साहित्याची दुकाने बंद असल्याने बहुतांश गोरगरिबांचे मजुरांचे कामधंदे बंद पडले आहेत.
मदतीचा ओघ झाला कमी
गत वर्षी लाॅकडाऊन लागल्यानंतर अनेक दानशूरांनी गरजूंना मदत केली हाेती. किराणा साहित्य, भाेजनाचे वितरण करण्यात आले हाेते. मात्र, यावर्षी काेराेनाचा कहर गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. तरीही दातृत्वाचा झरा आटल्याचे चित्र आहे. दिव्यांगांनाही कोणत्याच प्रकारची मदत नाही. गोरगरिबांचा व मजुरांचा तथा दिव्यांगांचा सर्वांनाच विसर पडला आहे.