रेतीची अवैध वाहतूक करणारे टिप्पर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:28+5:302021-01-13T05:29:28+5:30
बीबी : रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक करणारे टिप्पर लोणार तहसीलदार सैपन नदाफ यांच्या पथकाने जप्त करून २.८८ लाखांचा ...
बीबी : रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक करणारे टिप्पर लोणार तहसीलदार सैपन नदाफ यांच्या पथकाने जप्त करून २.८८ लाखांचा दंड वसूल केला आहे. दुसरबीड बीबी राज्य महामार्गावरून समृद्धी महामार्गाचे स्टिकर लावून या टिप्परमध्ये रेतीची वाहतूक सुरू हाेती.
रेती घाटाचे लिलाव झालेले नसतानाही रेती माफिया रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत आहे. पूर्णा नदीपात्रातून बेकायदा रेती घेऊन जात असताना बीबी येथे पोलीस स्टेशनसमोर राज्य महामार्गावर महसूलच्या पथकाने टिप्पर अडवले. टिप्परची पाहणी केली असता टिप्परमध्ये बेकायदा रेती वाहतूक होत असल्याचे समाेर आले. बीबी पोलिसांच्या सहकार्याने महसूलचे नायब तहसीलदार हेमंत पाटील, विलास नागरे मंडळ अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा करून वाळूचे भरलेले वाहन लोणार पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. दोन दिवसात टिप्पर मालकांनी नियमाप्रमाणे शासनाचा महसूल भरून पोलीस स्टेशनमधून वाहन ताब्यात घेतले. या कारवाईमुळे रेतीची अवैधरीत्या चोरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
कठाेर कारवाई करणार
गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. घाट चालू झाल्यानंतर रितसर पावत्या घेऊनच गौण खनिजाची वाहतूक करावी. गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिला आहे.