'समृद्धी'वर पुन्हा वाहनाचे टायर फुटले, दोन जखमी, कारही पलटी
By निलेश जोशी | Published: May 18, 2023 11:19 PM2023-05-18T23:19:27+5:302023-05-18T23:19:42+5:30
अपघाताचे सत्र सुरूच
नीलेश जोशी, बुलढाणा: समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा नजीक भरधाव वेगात असलेल्या कारचे टायर फुटल्याने यातील दोघे जखमी झाल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात घडली.
अपघातामधील दोन्ही जखमी हे गुजरात राज्यातील असून जीजे-२७-डीएम-८०५२ क्रमांकाच्या कारद्वारे ते मुंबईकडे जात होते. दरम्यान शहराजवळील समृद्धीच्या पिंपळखुटा शिवारात हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. कार सिंदखेड राजा एक्सचेंज नजिक मुंबई कॉरिडॉरजवळ आली असता टायर गरम होऊन अचानक फुटला. त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात कारमधील मुकेश पटेल व जय पटेल (रा. डांबरवाला, जि. अम्ब्रेला, गुजरात) हे दोघे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे प्रथमोपचार करून जखमींना जालना येथे हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त कार जेसीबीच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघाताची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड हे पोलिस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले होते. महामार्ग सुरक्षा पथकाचे पीएसआय शैलेश पवार, नायक पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, संदीप किरके, गोरख पालवे, श्रीकांत काळे, अभिलेख, इक्बाल तडवी, अजय दांडगे यांच्यासह डॉक्टर यासीन शहा व चालक सुभाष कणखर व क्यूआरव्हीचे श्रीराम महाजन, दीपक पाटील, राहुल गुंड यांनी मदतकार्य केले.