चार महिन्यांपासून मानधन थकीत
By admin | Published: October 7, 2014 10:51 PM2014-10-07T22:51:31+5:302014-10-07T22:51:31+5:30
निवडणुकीच्या रणधुमाळीत बुलडाणा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी दुर्लक्षित.
बुलडाणा : एकीकडे विधानसभा निवडणुकीची प्रचंड रणधुमाळी सुरू असताना खेडोपाडी व शहरी विभागात बालकांचे कुपोषण दूर करण्याचे महत्वाचे कार्य करणारे अंगणवाडी कर्मचारी मात्र दुर्लक्षित आहेत.
आधीच अतिशय तुटपुंज्या मानधनात काम करणार्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १ ऑगस्ट २0१४ रोजी सीटू संघटनेचे शिष्टमंडळ तत्कालीन महिला व बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांना भेटावयाला गेले असता, अंगणवाडी कर्मचार्यांसाठी वाढीव मानधनाची तरतूद वार्षिक अर्थसंकल्पात झालेली नाही, अशी माहिती दिली. त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेने वारंवार राज्य शासनाकडे वाढीव मानधन देण्याची मागणी केली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून वाढीवच नव्हे जुन्या दराने देखील अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन देण्यात आलेले नाही.
मागील वर्षीपयर्ंत अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनासाठी निधी नसल्यास उणे बजेट पद्धतीने मानधन दिले जात होते. मात्र ही पद्धतही आता बंद करण्यात आल्यामुळे व राज्याकडून निधीच अप्राप्त असल्यामुळे कर्मचार्यांचे मानधन करता आले नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.एस. कराळे यांनी दिल्याची माहिती, सीटूने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिलेली आहे.