बुलडाण्यातील शिवस्मारकाची आज पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:33 PM2021-02-22T12:33:06+5:302021-02-22T12:33:16+5:30
Buldhana News छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह आकर्षक अशा शिवस्मारकाची सोमवारी पायाभरणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहराचे वैभव ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह आकर्षक अशा शिवस्मारकाची सोमवारी पायाभरणी होत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत असून, त्यानुषंगाने शिवछत्रपती बहुउद्देशीय स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीस अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजता कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या नियमावलीच्या अधीन राहून हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष आ. संजय गायकवाड यांनी दिली. बुलडाणा शहरातील संगम चौकात बसस्थानकालगत असलेल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह हे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च येणार असून बुलडाणा शहरातील प्रत्येक कुटुंबात त्यांच्या स्वेच्छेने किमान एक रुपया वर्गणीही या स्मारकासाठी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खा. प्रतापराव जाधव, बुलडाणा अर्बनचे डॉ. सुकेश झंवर, जि.प.अध्यक्षा मनीषा पवार, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ, माजी आ.विजयराज शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, मोहम्मद सज्जाद, जालिंधर बुधवंत, राहुल बोंद्रे, ॲड. नाझेर काझी, लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, योगेंद्र गोडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा पंचधातूचा राहणार असून, भव्य असे स्मारकही येथे उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी आठ अश्वारूढ मावळे, प्रवेशद्वारासमोर दोन हत्ती आणि आणि किल्ला असे आकर्षक स्वरूप या स्मारकाचे राहणार आहे. जिल्हा नियोजन समितीतंर्गतही या स्मारकासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. स्थानिक केबल नेटवर्कवर हा कार्यक्रम लाइव्ह दाखविण्यात येणार असून घरीच बसून नागरिकांनी या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन टी. डी. अंभोरे यांनी केले आहे.