आज जिल्ह्यात गणरायाला निरोप
By admin | Published: September 15, 2016 01:59 AM2016-09-15T01:59:25+5:302016-09-15T01:59:25+5:30
बुलडाणा जिल्ह्यात ६३५ सार्वजनिक गणेश मंडळ; ढोल-ताशांच्या गजरात निघणार मिरवणूक.
बुलडाणा, दि. १४ - जिल्ह्यात गत दहा दिवसांपूर्वी मोठय़ा हर्षोल्हासात स्थापन झालेल्या गणरायाला गुरुवारी निरोप देण्यात येणार आहे. विविध गणेश मंडळे ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देणार आहेत. गणेश विसर्जनाकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी विविध गणेश मंडळे तसेच घरोघरी गणरायाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दहा दिवस सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले. सदर देखावे बघण्याकरिता भाविक गर्दी करीत होते. दररोज घरोघरी आरती व प्रसादाचे वाटप करीत होते. जिल्ह्यात ९५६ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. यापैकी ग्रामीण भागात ३४0 मंडळ आणि शहरी भागात २९५ मंडळांचा समावेश आहे. यावेळी समाजप्रबोधन करणार्या गणेश मंडळांना शासन पुरस्कार देणार असल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले.
जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन उत्सव साजरा केला जाणार आहे. सदर उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी, यासाठी दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी जिल्ह्यात सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बीअर बार अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-२ अनुज्ञप्ती आदी अबकारी अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.