आज पणन महासंघ निवडणुकीचा निकाल
By admin | Published: June 13, 2017 12:24 AM2017-06-13T00:24:00+5:302017-06-13T00:24:00+5:30
अटीतटीच्या लढतीत विजय कोणाचा ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या तीन जागांसाठी रविवार ११ जून रोजी मतदान झाले असून, मंगळवार १३ जूनला निकाल जाहीर होत आहे. प्रक्रिया व पणन मतदार संघाच्या खामगाव विभागात विद्यमान संचालक काँग्रेसचे प्रसेनजित पाटील व भाजपाचे राजेंद्र ठाकरे यांच्यात सरळ सामना होता. १६ मतदार होते. मतदान १०० टक्के झाले. त्यामुळे विजय कोणाचा याबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात आहे.
अनेक जण याबाबत अंदाज काढत आहे. काहींना वाटते दोनही उमेदवारांना समान ८ मते पडून ईश्वर चिठ्ठीचा आधार घ्यावा लागेल. तर काहींचा प्रसेनजित पाटील हे किमान एका मताने तरी निश्चित विजयी होतील, असा दावा आहे. याचा अर्थ लढत अटीतटीची झाली असे दिसते. जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा व लोकप्रतिनिधींचा मतदानाच्या दिवशी सहभाग दिसून आला. काँगे्रस, राकाँ, शिवसेना विरुद्ध भाजपा असे चित्र रविवारी मतदानाच्या वेळी दिसून आले. प्रसेनजित पाटील यांना किमान दहा मते मिळतील, असा काही नेत्यांचा दावा आहे. एकूणच निवडणूक ही अटीतटीची झाली असल्याने विजयाच्या बाबतीत अंदाज घेणे कठीण झाले आहे. प्रसेनजित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने त्यांचा विजय होणे महत्त्वाचे आहे. शेतकरी आंदोलनामुळे पालकमंत्र्यांसह भाजपाचे आमदारही त्यात व्यस्त असल्याच्या पृष्ठभूमीवर या निवडणुकीत राजेंद्र ठाकरे यांच्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे चित्र दिसून आले नाही. तसेच मत कोटा कमी असतानासुद्धा भाजपाने या निवडणुकीत धाडस केले. मतदारांनी नेमके काय केले याचा निर्णय निकालानंतर दिसून येईल.