आज एमपीएससीचा पेपर होता, ओमचे स्वप्न अपूर्णच राहिले; समृद्धी महामार्गावर काळाने हिरावले
By निलेश जोशी | Published: June 4, 2023 12:49 PM2023-06-04T12:49:11+5:302023-06-04T12:49:56+5:30
वाशिम येथून लग्न आटोपून येत असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडातील तिघेजण लघु शंकेसाठी फर्दापूर टोल नाक्यानजीक थांबले होते, सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना वाहनात बसत असताना उडवले.
समृद्धी महामार्गावर गेल्या २४ तासांत तीन अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. हे सर्व अपघात फर्दापूर टोल नाक्याजवळ घडले आहेत. मृतांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. हे लोक लग्नसोहळा आटोपून येत होते. तेव्हा एका टेम्पोने त्यांना उडविले आहे. यापैकी एका तरुणाचा आज एमपीएसीचा पेपर होता, त्याचाही मृत्यू झाला आहे.
समृद्धीवर चॅनल क्रमांक २८३ वर झालेल्या अपघातामध्ये वाशिम येथून लग्न आटोपून येत असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडातील तिघेजण लघु शंकेसाठी फर्दापूर टोल नाक्यानजीक थांबले असता भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना वाहनात बसत असताना उडवले. यामध्ये एकाचा घटनास्थळीच तर दोघांचा मेहकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. मृतामध्ये विजय शेषराव मांटे (४८), ओम मांटे (२०), तुषार मांटे (३४) यांचा समावेश आहे.
अपघातामधील मृतक ओम मांटेचा रविवारी एमपीएसीचा पेपर होता. त्यामुळे त्याची आई लग्नाच्या वऱ्हाडासोबत त्याचा डबा तयार करण्यासाठी पुढे निघाली होती. तर ओम मागच्या गाडीने येत होता. सकाळीच तो पेपर देण्यासाठी जाणार होता. परंतू नियतीला ही बाब मान्य नव्हती व अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. एकाच गावातील तिघांचा असा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.