शौचालय स्वच्छता प्रकरण : पालकांवर दबाव; चिमुकला बालगृहात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 11:30 AM2021-06-05T11:30:31+5:302021-06-05T11:32:19+5:30
Buldhana News : मारोड गावातील विलगिकरण कक्षाच्या शौचालयाची सफाई एका ८ ते १० वर्षाच्या चिमुकल्या मुलाकडून करून घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल : मारोड ग्रामपंचायतीच्या विलगीकरण केंद्रातील शौचालयाची स्वच्छता करून देणाऱ्या चिमुकल्याला शुक्रवारी बुलडाणा येथील बालगृहात दाखल करण्यात आले. गावातील काहींनी मुलाच्या पालकांवर दबाव आणणे सुरू केले होते. तर मुलाला बालगृहात दाखल करण्याची जबाबदारी पोलिसांची होती. त्यानुसार त्याला बुलडाणा येथे बाल समितीकडे सोपवण्यात आले.
संग्रामपूर तालुक्यातील मारोड गावातील विलगिकरण कक्षाच्या शौचालयाची सफाई एका ८ ते १० वर्षाच्या चिमुकल्या मुलाकडून करून घेण्यात आली. याप्रकरणी तालुक्यातील बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेमधील काही कर्मचाऱ््यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या बाबत लोकमतने पाठपुरावा करून वृत प्रकाशित केले. त्यामध्ये तालुक्यातील प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविरुद्ध नायब तहसिलदार यांच्या तक्रारीनुसार तामगाव पोलिसांत बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे चिमुकल्याच्या पालकाला गावातील काही राजकीय मंडळीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु झाला.
याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना ‘त्या’ चिमुकल्याच्या मामाने दबाव आणून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यासाठी मुद्रांक व स्वाक्षरी मागत आहेत, असे सांगितले. मुलाला बुलडाणा येथील शासकीय मुलाचे निरीक्षण बाल गृह तथा बाल न्याय मंडळ येथे पालकांमार्फत बोलावून घेण्यात आले आहे. चौकशी समितीने त्या मुलाकडून माहिती घेतली. तसेच मुलाला बालगृहात दाखल करून घेतले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, शेख अनिस, मुलाचे पालक उपस्थित होते. गेल्या पाच ते सहा दिवसापासून हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. एक समितीही या प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती आहे.