वीजेअभावी शौचालय व घरकुल बांधकाम पाहणी रद्द!
By admin | Published: June 16, 2017 01:28 PM2017-06-16T13:28:46+5:302017-06-16T13:28:46+5:30
शौचालय व घरकुल बांधकामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व चमुला काही घरांची पाहणी करुन रद्द करण्याची वेळ आली.
साखरडोह : मानोरा तालुक्यातील साखरडोह येथे शौचालय व घरकुल बांधकामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व चमुला काही घरांची पाहणी करुन रद्द करण्याची वेळ १४ जून रोजी आली. गावात विज पुरवठाच नसल्याने बॅटरीच्या प्रकाशात काही बांधकामाची पाहणी करुन अधिकारी व चमुनी कार्यक्रम आटोपता घेतला.
साखरडोह येथे १४ जुन रोजी सायंकाळी ७.३० वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व त्यांच्यासोबत जि.प.चे काळे, मानोरा पंचायत समिती गटविकास अधिकारी गुलाबराव राठोड, स्वच्छता विभाग अभिजीत दुधाटे ,सरपंच गणेश भोयर, सचिव आर.आर.शिंदे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
येथे ३५ पैकी ३० घरकुल पूर्ण झाले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागामध्ये असणारी विद्युत पुरवठयाची अडचण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीदरम्यान जाणवली. अंधारामध्ये व मोबाईल टार्चमध्येच त्यांनी घरकुल व शौचालयाची पाहणी केली. विद्युत पुरवठयाअभावी ग्रामीण भागातील जनतेला होणारा त्रासजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांना सुध्दा झाला. जवळपास ३० घरकुल बांधकामाची पाहणी व शौचालयाची पाहणी करायची होती, परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांनी आपला पाहणी दौरा रद्द केला व पाहणी थांबवली. पाहणी न करता तयांनी घरकुल बांधकाम लाभार्थ्याशी चर्चा करुन अडचणी, समस्या याची माहिती घेतली त्याचसोबत वृक्ष लागवड याची सुध्दा माहिती घेतली. तसेच नागरिकांनी आणखी शौचालय बांधुन त्यांचा वापर करावा व गाव हागणदारीमुक्त करुन गाव स्वच्छ व निर्मल करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .