शाैचालय बंद, टाकीतील किडे नागरिकांच्या घरात; नगरपालिका लक्ष देणार का?

By विवेक चांदुरकर | Published: January 21, 2024 03:02 PM2024-01-21T15:02:47+5:302024-01-21T15:03:39+5:30

गोपाळनगर भागातील नागरिकांचे घरात राहणे झाले कठीण

Toilets closed, worms in tanks in citizens' homes; Will the municipality pay attention? | शाैचालय बंद, टाकीतील किडे नागरिकांच्या घरात; नगरपालिका लक्ष देणार का?

शाैचालय बंद, टाकीतील किडे नागरिकांच्या घरात; नगरपालिका लक्ष देणार का?

खामगाव : शहरातील गोपाळनगर भागातील सार्वजनिक शाैचालयाची साफसफाई करण्यात येत नाही. तसेच सार्वजनिक शाैचालय बंद असून, टाकीतील किडे आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे घरात राहणे कठीण झाले आहे. नगरपालिकेने त्वरित साफसफाई करून टाक्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी यांना २० जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनानुसार, गोपाळनगर भागातील सार्वजनिक शाैचालयाची मागील २० ते २५ दिवसांपासून सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील ५० ते ६० घरांमधील नागरिकांना, महिलांना, उघड्यावर शाैचास जावे लागत आहे. तसेच या शाैचालयाच्या टाक्यांतील पाणी व किडे आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे घरामध्ये राहणे कठीण झाले आहे. घरातील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून, दवाखान्यात भरती करावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा नगरपालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवेदन दिले. अनेकदा नगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना साफसफाई करण्याची मागणीही केली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यासोबतच खारोडे गल्लीतील नागरिकांच्या घरात नाली न काढल्यामुळे पाणी जात आहे. नगरपालिकेने त्वरित साफसफाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवराज भेरडे, प्रतापसिंग सोळंके, दीपक बावने, रूपेश डाहे, काशीराम ढवळे, आकाश सोळंके, सहदेव सोळंके, अर्जुन इगोकार, शिवाजी सोळंके, रवी वाघ, पंकज डाहे आदींच्या सह्या आहेत.

नगरपालिकेकडे वारंवार निवेदन देऊनही नगरपालिकेने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. या भागात पावडर टाकण्यात यावी, नियमित नाल्यांची साफसफाई करायला हवी तसेच फवारणी करण्यात यावी, वार्डप्यून यांची बदली करण्याची गरज आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे.
-युवराज भेरडे, नागरिक

शाळेसमोर साचले कचऱ्याचे ढीग
शाळा क्रमांक तीनजवळील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या ठिकाणी प्लास्टिकसह कचरा टाकण्यात येतो. या रस्त्यावरून दररोज अनेक विद्यार्थी ये-जा करतात. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून कचरा पडून आहे. मात्र, नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Toilets closed, worms in tanks in citizens' homes; Will the municipality pay attention?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.