शौचालय बांधकाम रक्कम अपहार प्रकरणी चौकशी थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:52 PM2018-09-25T15:52:30+5:302018-09-25T15:52:40+5:30

Toilets Construction Amount fraud inquiry slow | शौचालय बांधकाम रक्कम अपहार प्रकरणी चौकशी थंडबस्त्यात!

शौचालय बांधकाम रक्कम अपहार प्रकरणी चौकशी थंडबस्त्यात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: तालुक्यातील टेंभूर्णा येथील शौचालय बांधकाम रक्कम अपहार चौकशी प्रकरण थंडबस्त्यात पडले आहे. सरपंचांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते. सबळ पुरावे असतानाही कारवाईस विलंब होत असल्यामुळे टेंभूर्णा येथे आश्चर्य व्यक्त होत आहे.

लाभार्थ्याची बनावट स्वाक्षरी करून शौचालय बांधकामाची रक्कम हडपल्याप्रकरणी कारवाईसाठी सरपंच आणि सचिवाविरोधात टेंभूर्णा येथे ३० आॅगस्टरोजी ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत  तत्कालीन ग्रामसचिव आणि सरपंचावर कारवाई करण्याचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव मान्यतेसाठी पंचायत समिती स्तरावर पाठविण्यात आला. 

अपहार प्रकरण उघडकीस आल्यापासूनच याप्रकरणी कारवाईसाठी चालढकल केली जात असल्याची तक्रारकर्त्यांची ओरड आहे. उल्लेखनिय म्हणजे ग्रामसभेलाही जवळपास महिना भराचा कालावधी लोटला. मात्र, प्रशासकीय स्तरावरून यासंबंधी कारवाईसाठी चालढकल केली जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. दरम्यान, विविध रक्कमेतील अपहार प्रकरणी तत्कालीन सचिव शिवदे निलंबित आहेत. त्यानंतर शौचालय बांधकामाचे प्रकरण समोर आले. तर सरपंच काळणे यांना नोटीस बजावण्यात आली.  मात्र, कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्यामुळे  प्रशासकीय स्तरावरून सरपंचांना पाठीशी घातल्या जात असल्याची चर्चा आहे.

बनावट स्वाक्षरीद्वारे हडपली होती रक्कम!

खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथील लालसिंग झामसिंग सोळंके यांच्या नावे शौचालय न बांधकाम न करता आणि नमुना क्रमांक १२ वर लाभार्थ्यांच्या बनावट स्वाक्षरीच्या आधारे २३ मार्च रोजी सरपंच आणि सचिवांनी रक्कम हडपली. याप्रकरणी लालसिंग सोळंके यांनी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समितीत तक्रार दिली. ३० आॅगस्ट रोजी टेंभूर्णा येथे ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावातील १४५ नागरिकांची उपस्थिती होती. यासभेत शौचालय अनुदानाचा गैरवापर केल्याप्रकरणी सरपंच रुख्माबाई काळणे, तत्कालीन सचिव शिवदे यांच्याविरोधात सवार्नुमते ठराव मंजूर करण्यात आला होता.


सरपंचांना नोटीस; ग्रामसेवक आधीच निलंबित!

शौचालय बांधकाम अपहार प्रकरणी सरपंच रूख्माबाई काळणे यांना पंचायत समिती प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तर शौचालय बांधकामासोबतच इतरही निधी वाटपात  अनियमितेप्रकरणी ग्रामसेवक शिवदे यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

 शौचालय बांधकाम अपहार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सरपंच यांना नोटीस बजावण्यात आली. दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी आपले प्रयत्न आहेत. 

-किशोर शिंदे, गटविकास अधिकारी, खामगाव.

शौचालय बांधकामाचा लाभ न देता आपल्या नावावर रक्कम काढण्यात आली. सरपंच आणि सचिवांनी माझी फसवणूक केली असतानाही त्यांना प्रशासकीय स्तरावरून पाठीशी घालण्यात येत आहे. पुरावे असतानाही अतिशय संथगतीने चौकशी केली जात आहे.

- लालसिंग सोळंके, तक्रार कर्ता, टेंभूर्णा, ता. खामगाव.

Web Title: Toilets Construction Amount fraud inquiry slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.