शौचालयांची उद्दिष्टपूर्ती ४८ टक्क्यांवरच!
By admin | Published: May 15, 2017 12:30 AM2017-05-15T00:30:35+5:302017-05-15T00:30:35+5:30
मलकापूर : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानास मुदतवाढ देण्यात आल्यावरही मलकापूर नगरपालिका अखत्यारित शौचालयांची उद्दिष्टपूर्ती सुमारे ४८ टक्क्यांवरच थांबल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानास मुदतवाढ देण्यात आल्यावरही मलकापूर नगरपालिका अखत्यारित शौचालयांची उद्दिष्टपूर्ती सुमारे ४८ टक्क्यांवरच थांबल्याची माहिती असून, हगणदरीमुक्तीसाठी शासन एकीकडे गंभीर असताना त्या उद्देशास स्थानीय पालिकेत खो बसण्याची भीती व्यक्त होताना दिसते.
सन २०१६-१७ या वर्षात राज्यभरातील महापालिका व नगरपालिकांना ठरावीक उद्दिष्ट देण्यात आली आहेत. मलकापूर नगरपालिकेला ३ हजार २७१ एवढ्या शौचालयाच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी पालिकेने ४ हजार अर्जांचे वाटप केले. त्यापैकी २ हजार ७०० इतक्या नागरिकांनी शौचालयासाठी अर्ज केले आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विशिष्ट अनुदानाची तरतूद शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१७ या मुदतीत शौचालयांची निर्मिती अपेक्षित होती. मात्र, तसे झाले नाही. त्या धर्तीवर मुदतवाढ शासनाने दिल्याची माहिती आहे. असे असताना स्थानिक नगरपालिका अखत्यारित आरोग्य विभागाला त्यांच्याकडे प्राप्त २ हजार ७०० इतक्या अर्जांपैकी १ हजार ३०० इतकीच शौचालये निर्माण करता आल्याने एकूण उद्दिष्टांपैकी सुमारे ४८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक पालिकेला ३ हजार २७१ शौचालयांचे उद्दिष्ट आहे; अर्थात आरोग्य विभागाचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. याखेरीज वैयक्तिक शौचालयाखेरीज सार्वजनिक शौचालयांसाठी जागा शोधणे, त्यावर शौचालयांची निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती असून, उर्वरित काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जाते.
हगणदरीमुक्तीसाठी शौचालयाची निर्मिती व्हावी, याकरिता प्रामाणिक प्रयत्न आहे. अर्थात त्यात विविध अडचणींचा सामना करावा लागला. तरीदेखील शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करुन स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- पराग रुढे आरोग्य निरीक्षक, न.प. मलकापूर