वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By संदीप वानखेडे | Published: November 16, 2023 08:09 PM2023-11-16T20:09:56+5:302023-11-16T20:10:29+5:30
शहराच्या जवळील टोल प्लाझावर अनेक कर्मचारी काम करतात. दोन - तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.
सिंदखेडराजा : शहराच्या जवळील हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे, जवळपास एक तास येथे गोंधळाची परिस्थिती होती. एक महिन्याचे वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी माेफत वाहने साेडली.
शहराच्या जवळील टोल प्लाझावर अनेक कर्मचारी काम करतात. दोन - तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२:३० वाजता संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले.
एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे टोल प्लाझावरून ये - जा करणारी वाहने मोफत जात होती. यासंदर्भातील माहिती मिळताच स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनांस्थळी पोहोचले. कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात आली. एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देण्यात आली.
एमएसआरडीसीकडून रोडवेज सोलूशन यांना हे टोल प्लाझा चालविण्यास देण्यात आले आहे. रोडवेजकडून सदर टोल कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले नसल्याचे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. ऐन दिवाळी सणात वेतन मिळाले नसल्याने टोल कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदाेलन मागे घेतले.